भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग असणाऱ्या हिंगांचे उत्पादन आतापर्यंत भारतात घेतले जात नव्हते. आता लवकरच भारतामध्येही हिंगाचे उत्पादन घेण्यात येणार आहे. पालमपूरमधील इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्सेस टेक्नोलॉजी (आयएचबीटी) या संस्थेच्या देखरेखीखाली हिंगाचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. येथील लाहुलच्या खोऱ्यातील क्वारिंग गावामध्ये हिंगाचं पिक घेण्यात आलं आहे. अशाप्रकारे देशामध्ये हिंगाचे उत्पादन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हिंग हे मूळचे इराण आणि अफगाणिस्तानचे पिक आहे. हे दोन्ही देश जगभरात हिंगाचा पुरवठा करतात. हिंग हे कोरड्या आणि थंड वाळवंटीय प्रदेशामध्ये घेतले जाणारे पीक आहे. हिंग भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जात असले तरी ते युरोपीयन देशांमध्येही औषध म्हणून अनेक ठिकाणी वापरले जाते. भारत दरवर्षी ६०० कोटी रुपयांचे हिंग आयात करतो. मात्र आता हिंगाचे पिक घेतल्यानंतर भारताचा हा आयात खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारत का घेतोय उत्पादन?

भारत हिंगाचे उत्पादन का घेत आहे यासंदर्भात काऊन्सिल ऑफ सायन्टीफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएरआयआर) दिल्लीचे व्यवस्थापकीय संचालक असणार डॉ. शेखर मांडे यांनी अधिक माहिती देताना या विषयावर मागील चार वर्षांपासून काम सुरु असल्याचे सांगितले. “आम्ही भारतामध्ये हिंगाचे उत्पादन घेण्यासंदर्भातील संशोधन २०१६ पासून सुरु केले. हिंगाचे उत्पादन हे केवळ एकदम थंड आणि काही विशिष्ट ठिकाणी घेता येईल. लडाख, लाहुल-स्पितिच्या खोऱ्यात हिंगाचे उत्पादन घेणं शक्य आहे. यापूर्वी आपण अफगाणिस्तान आणि इराणमधून हिंग आयात करायचो,” असं डॉ. मांडे म्हणाले.

४० टक्के वापर भारतात

पालमपूरमधील इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्सेस टेक्नोलॉजीचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली हिंगाचे उत्पादन घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. “हिंगाचा सर्वाधिक वापर असणाऱ्या देशांमध्ये आपण पहिल्या स्थानी असूनही आपल्याकडे त्याचे उत्पादन घेतलं जात आहे. हिंगासाठी आपण पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहोत. आपण अफगाणिस्तान, इराण आणि उझबेगिस्तानमधून १२०० मेट्रीक टन हिंग आयात करतो ज्याची किंमत ६०० कोटी रुपये इतकी आहे. आम्ही हिमाचलमध्ये आता पाच हेक्टरमध्ये हिंगाचे पिक घेतलं आहे. आम्ही हे उत्पादन वाढवण्याचा विचार करत असून पुढील तीन वर्षामध्ये किमान ३०० हेक्टरवर उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे,” असं मांडे म्हणाले. जगभरातील हिंगाच्या एकूण वापरापैकी ४० टक्के वापर हा एकट्या भारतात केला जातो. हिमाचल प्रदेश राज्य सकारने या प्रकल्पासाठी ४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याच निधीच्या मदतीने विशेष सेटअप तयार करण्यात आला आहे.

कुठे केली आहे लागवड?

भारतामध्ये हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सीएसआयआर-आयएचबीटीने एकत्र येऊन हे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहेत. हिंगाच्या एकूण सहा प्रजातींचे उत्पादन घेतलं जाणार आहे. आयसीएआरच्या नॅशनल ब्युरो ऑफ प्लॅण्ट जेनेटिक रिसोर्सेसच्या मदतीने इराणमधील मूळ बियाणांच्या आधारे भारतातील उत्पादन घेतलं जाणार आहे. मागील ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच बारतामध्ये असा प्रयोग होत असल्याचे आयसीएआर-एनबीपीजीआरने म्हटलं आहे. सीएसआयआर-आयएचबीटीने सीहॅब, रिबलिंग, लाहुल, स्पितीमध्ये हिंगाची लागवड केली आहे.