भारतात बहुरक्तस्राव म्हणजे हिमोफिलियाच्या ८० टक्के रुग्णांचे निदानच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते आरोग्य तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली तरी ती अजून पूर्णपणे सामान्यांच्या आवाक्यात आलेली नाही.

भारतात हिमोफिलिया रुग्णांची संख्या दोन लाखांच्या आसपास असून हे प्रमाण जगात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. हिमोफिलियात एखादी जखम झाल्यानंतर रक्त गोठून रक्तस्राव थांबवण्याची जी प्रक्रिया असते ती होत नाही त्यामुळे बरेच रक्त बाहेर जाते. हिमोफिलिया फाउंडेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे की, रक्तात ते गोठवणारा घटक पुरेशा प्रमाणात नसल्याने हा रोग होतो. त्यासाठी अजून तरी कुठलाही उपचार नाही. पण त्या रोगाचे निदान लवकर झाले नाही तर त्यातून संधीवात, कायमची अवयव विकृती व इतर परिणाम होतात.

नवी दिल्ली येथील श्रीगंगाराम हॉस्पिटलने याबाबत संशोधन केले आहे त्यानुसार हिमोफिलियाकडे लोक नेहमी दुर्लक्ष करतात त्यामुळे आरोग्यास अपाय होतो. हिमोफिलिया उपचारात  भारताने प्रगती केली असली तरी निदानाच्या पातळीवर समस्या आहेत असे श्रीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. रूबी रेषी यांनी सांगितले.

सध्या देशातील नोंदणीनुसार या रोगाचे केवळ २० हजार रुग्ण असले तरी एकूण दोन लाखांपेक्षा अधिक जणांना हा रोग आहे. त्यामुळे या रोगाच्या निदानासाठी केंद्रांची गरज आहे. हिमोफिलिया हा साधारणपणे आनुवंशिक असतो व पाच हजार पुरुषात एकाला होतो. काही वेळा जनुकातील उत्परिवर्तनानेही तो रोग होतो असे रुग्ण एक तृतीयांश आहेत. या रोगासाठी अ‍ॅक्टीव्हेटेड पार्शियल थ्रॉम्बोप्लास्टिन टाइम (एपीटीटी) व प्रोथ्रॉम्बिन टाइम टेस्ट (पीटी) या दोन चाचण्या आहेत. त्यात रक्त गोठण्याची क्रिया व्यवस्थित होते की नाही हे समजते अशी माहिती  लखनौचे राजेश कश्यप यांनी दिली.