एरवी हेपॅटिटिसची चाचणी करण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात, पण आता वैज्ञानिकांनी कागदी यंत्राच्या मदतीने निदानाची चाचणी शोधली आहे, त्यासाठी केवळ १ डॉलर इतका खर्च येतो. वैद्यकीय रोगनिदान चाचण्यांसाठी वर्षांकाठी लोकांचे बरेच पैसे खर्च होत असतात. ही चाचणी प्रत्यक्ष वापरात आल्यास पैसे वाचणार आहेत.
हेपॅटिटिसची ही चाचणी डीएनए विश्लेषणावर आधारित असून ती चटकन होते व त्यात खर्चही फार कमी म्हणजे अवघा एक डॉलर येतो. त्यात पुरुषांच्या पुनरुत्पादन क्षमतेचीही चाचणी होते. असे असले तरी ही चाचणी मुख्यत्वे कमी उत्पन्न गटातील लोकांना हेपॅटिटिसच्या निदानासाठी वापरता येणार आहे, असा संशोधकांचा दावा आहे. डीएनए विश्लेषण तंत्र हे न्यायवैद्यक विज्ञान, जनुकशास्त्र व रोगनिदानासाठी आवश्यक असते, पण त्या विश्लेषणासाठी खर्चीक प्रयोगशाळा लागतात व त्यामुळे सर्व लोक या चाचण्या आर्थिक क्षमतेअभावी करू शकत नाहीत त्यांना या संशोधनातून दिलासा मिळणार आहे.
नॅनो पदार्थातील प्रगतीमुळे डीएनए विश्लेषण सोपे झाले असून त्यामुळे चाचणीचा खर्चही कमी झाला आहे. टोरांटो विद्यापीठाचे डेव्हिड सिंटन व त्यांच्या सहकाऱ्यांनी आता नॅनो पदार्थापासून कागदी तपासणी संच तयार करण्याचे ठरवले असून त्यात कुठल्याही उच्च तंत्रज्ञान सुविधा न वापरता डीएनए चाचणी करता येईल. संशोधकांच्या मते या कागदी संचाच्या मदतीने केल्या जाणाऱ्या चाचणीस केवळ १ डॉलर खर्च येईल.
केवळ १० मिनिटांत यात हेपॅटिटिस बीचा विषाणू रक्तात आहे की नाही हे कळते. रक्तद्रवात कमी प्रमाणात विषाणू असले तरी ते यात कळतात. एखादा पुरुष पुनरुत्पादनक्षम आहे की नाही हे ठरवण्यासाठी डीएनए चाचणी करता येते. यात शुक्रपेशींचे नमुने घेऊन त्यांची डीएनए चाचणी करता येते. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.