बंगळुरूच्या संस्थेमधील वैज्ञानिकांचे संशोधन
तुळशीच्या रोपाचे भारतीयांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्दी असो वा ताप.. त्यावर अंगणातील तुळशीच्या काढय़ाचा उपयोग केला जातो. पण तुळशीमध्ये आरोग्यविषयक नेमके काय गुणधर्म असतात, तुळशीमध्ये नेमकी काय संयुगे असतात, ज्याचा शरीराला फायदा होतो याबाबत अद्याप संशोधन झाले नव्हते. पण बंगळुरूच्या वैज्ञानिकांनी तुळशीच्या वैद्यकीय गुणधर्माचा नेमका शोध घेतला आहे. बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्स या संस्थेच्या संशोधकांनी तुळशीच्या रोपाचा जनुकीय आराखडा तयार केला आहे. त्यामुळे तुळशीमध्ये कुठल्या जनुकांमुळे वैद्यकीय गुणधर्म तयार होतात याचा उलगडा होत आहे.
तुळशीचा कच्चा जनुकीय आराखडा तयार करण्यात आला असून त्याच्या आधारे असे सांगण्यात आले की, तुळशीमधील ‘वैद्यकीय गुणधर्म’ हे रोपाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असतात. त्यामुळेच त्यात विशिष्ट संयुगे तयार होतात, असे एनसीबीएसच्या प्रमुख संशोधक सौदामिनी रामनाथन आणि त्यांच्या पथकाने म्हटले आहे. इनस्टेम, सीसीएएमपी, बंगलोर लाइफ सायन्स सेंटर या संस्थांच्या सदस्यांनीही या संशोधनात भाग घेतला होता.
इनस्टेमचे रामस्वामी यांनी सांगितले की, तुळशीची जनुकीय क्रमवारी तयार केली असता त्यात उरसॉलिक आम्ल हे वैद्यकीयदृष्टय़ा महत्त्वाचे संयुग दिसून आले. जर कृत्रिम जीवशास्त्रीय तंत्राचा वापर केला, तर उरसॉलिक आम्लाचे विश्लेषण केले तर खूप फायद्याचे होईल. जनुकीय माहिती गोळा करण्यासाठी तुळशीच्या पाच प्रजातींचा वापर करण्यात आला आणि त्यानंतर त्यातील निष्कर्ष तपासले असता कृष्ण तुळशीतील वेगळे संयुगही सापडले आहे.