पावसाळा सुरु झाला की वातावरण एकदम बदलून जातं. हवेत गारवा निर्माण होतो, सर्वत्र हिरवळ दाटून येते. त्यामुळेच अनेकांचा हा आवडता ऋतू आहे. मात्र वातावरणात चैतन्य फुलवणारा हा ऋतू सुरु झाला की त्यासोबतच काही समस्याही ओघाओघाने येतात. यात खासकरुन पावसाळ्यात होणारे आजार आणि सर्वत्र फिरणाऱ्या त्रासदायक माश्या. हवेत ओलावा असल्यामुळे या काळात आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यातच या काळात माशा, डास किंवा अन्य किटकांचा फैलावही मोठ्या प्रमाणावर होतो. विशेष म्हणजे या सगळ्यात माश्या या सतत चेहऱ्याभोवती किंवा पदार्थांभोवती एकसारख्या घोंगावतांना दिसतात. त्यामुळे या त्रासदायक माश्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात. चला तर पाहुयात माश्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी करता येणारे काही घरगुती उपाय –

१. तुळस-
घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर दारापुढे तुळस ही हवीच. तुळशीचे अनेक गुणधर्म आहेत. तुळशीमुळे हवेतील वातावरण स्वच्छ राहतं. तसंच तिच्यात किटकांना दूर ठेवण्याचीही क्षमता असतो. त्यामुळे घरात सतत माश्या येत असतील तर तुळशीचं एक रोपटं दारात किंवा खिडकीत ठेवावं.

२. लिंबू –
चवीला आंबट असलेलं लिंबू माश्या पळवून लावण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यासाठी लिंबाचे दोन भाग करावेत. यात दोन्ही भागावर सहा-सात लवंगा रोवायच्या. आणि ज्या भागात माश्यांचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्याठिकाणी हे लिंबू ठेवायचं.

३. कापूर-
देवपुजेत महत्त्वाचा मानला जाणारा घटक म्हणजे कापूर. घरात माश्यांचा त्रास वाढला असेल तर कापूर जाळावा किंवा घरातली कोपऱ्यांमध्ये कापूरच्या गोळ्या ठेवाव्यात.

४. पुदिना-
सुक्या पुदिन्याची पाने वाटून एका कापडात ते गुंडाळून त्याचे छोटे गाठोडे बनवून घरात ठेवावे. याने माश्या घरात येणार नाही.

५. निलगिरी-
निलगिरीच्या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो हवाबंद डब्यात ठेवा. ज्याठिकाणी कीटक किंवा माश्यांचा त्रास जाणवेल, तेथे हा डबा उघडा करून ठेवा.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)