Hero Electric ने दोन नव्या इ-स्कूटर भारतीय बाजारात लाँच केल्या आहेत. Optima ER आणि Nyx ER या नावाने दोन स्कूटर लाँच करण्यात आल्या असून अनुक्रमे 68 हजार 721 रुपये आणि 69 हजार 754 रुपये इतकी किंमत आहे. या एक्स-शोरुम किंमती असून ईशान्य भारत वगळता देशभरात सर्वत्र या किंमती लागू असतील. ईशान्य भारतात 71 हजार 543 इतकी Optima ER ची किंमत आहे, तर 72 हजार 566 रुपये इतकी Nyx ER ची किंमत आहे. हिरो इलेक्ट्रिकच्या ऑप्टिमा ईआर आणि एनवायएक्स ईआर नावाच्या इलेक्ट्रिक स्कूटर आधीपासूनच बाजारात आहेत. पण, आता कंपनीने याचे दोन नवीन मॉडल लाँच केले आहेत.

या दोन स्कूटर्समधील ऑप्टिमा ईआर स्कूटर खास ऑफिसला जाणारे मध्यमवर्गीय आणि कॉलेजचे विद्यार्थी यांना डोळ्यांसमोर ठेऊन तयार करण्यात आली आहे. NYX ER ची निर्मिती छोटे व्यावसायीक, व्यापारी, ई-कॉमर्स डिलिव्हरी कर्मचारी आणि भाड्याने दिल्या जाणाऱ्या ई-बाइक्सच्या मागणीनुसार होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही स्कूटर्समध्ये अॅलॉय व्हिल्स, एलईडी हेडलाईट्स, डिजिटल स्पीडोमीटर, टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रिजनरेटिव ब्रेकिंग यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

Optima ER या स्कूटरच्या नावामध्ये ER चा अर्थ एक्सटेंडेड रेंज (Extended Range) असा आहे. म्हणजेच हे नवं मॉडेल आता आधीपेक्षा जास्त अंतर धावेल. रेंज वाढविण्यासाठी नव्या मॉडल्समध्ये ड्युअल लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. 4 ते 5 तासांमध्ये दोन्ही स्कूटरची बॅटरी चार्ज होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ऑप्टिमा ईआर 110 किलोमीटर आणि एनवायएक्स ईआर 100 किलोमीटरपर्यंतचं अंतर कापू शकते असा दावा कंपनीने केला आहे. 42 किलोमीटर प्रतितास इतका या दोन्ही स्कूटरचा टॉप स्पीड आहे. योग्य काळजी घेतल्यास बॅटरी पाच वर्षांपर्यंत कार्यरत राहील असंही कंपनीने म्हटलं आहे.