14 October 2019

News Flash

हिरोची नवी स्कुटर Maestro Edge 125 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत

तीन व्हेरिअंट्सपैकी फ्युअल इंजेक्टेड व्हेरिअंट म्हणजे देशातील पहिली फ्युअल इंजेक्टेड स्कुटर आहे

‘हीरो मोटोकॉर्प’ने सोमवारी(दि.१३) आपली बहुप्रतीक्षित स्कुटर Hero Maestro Edge 125 लाँच केली आहे. तीन व्हेरिअंटमध्ये कंपनीने ही स्कुटर लाँच केली असून यामध्ये कार्ब्युरेटर ड्रम ब्रेक, कार्ब्युरेटर डिस्क ब्रेक आणि फ्युअल इंजेक्टेड व्हेरिअंटचा समावेश आहे. अनुक्रमे 58 हजार 500 रुपये, 60 हजार रुपये आणि 62 हजार 700 रुपये इतकी या तिन्ही व्हेरिअंट्सची एक्स शोरूम किंमत आहे. 16 मे पासून कंपनीच्या डिलरशिपमध्ये या स्कुटरसाठी बुकिंग सुरू होत असून या महिन्याच्या अखेरपर्यंत ही स्कुटर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येईल.

या नव्या स्कुटरमध्येही कंपनीने Destini 125 मध्ये वापरण्यात आलेलं 125cc इंजिन दिलं आहे. यातील फ्युअल इंजेक्टेड व्हेरिअंट म्हणजे देशातील पहिली फ्युअल इंजेक्टेड स्कुटर आहे. या व्हेरिअंटमधील इंजिन 7,000rpm वर 9.2hp पावर आणि 5,000rpm वर 10.2Nm पीक टॉर्क जनरेट करतं. तर, कार्ब्युरेटर व्हेरिअंटमधील इंजिन 6,750rpm वर 8.83hp पावर आणि 5,000rpm वर 10.2Nm टॉर्क जनरेट करतं.

तरुणांना आकर्षित करण्याच्या हेतूने या स्कुटरचं डिझाइन तयार करण्यात आलं आहे. यामध्ये एक्स्टर्नल फ्युअल-फिलर कॅप आणि डिजिटल अॅनालॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यामध्ये हीरो कंपनीचं स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञान (Hero i3S) देण्यात आलं असून मायलेज उत्तम असेल असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय स्कुटरच्या सीटखाली युएसबी पोर्ट आहे. स्कुटरच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे मोनोशॉक सस्पेंशन आहे. स्कुटरचं पुढील चाक 12 इंच आणि मागील चाक 10 इंचाचं आहे. ब्ल्यू, ब्राउन, ग्रे आणि रेड या चार मॅट फिनिश कलर्सचा पर्याय ग्राहकांपुढे आहे.

डेस्टिनी 125 नंतर हीरो कंपनीची ही दुसरी 125cc क्षमतेची स्कुटर आहे. भारतीय बाजारात या स्कुटरची टक्कर टीव्हीएस एनटॉर्क आणि होंडा ग्रॅझिया यांसारख्या स्कुटरशी असेल. या दोन्ही स्कुटरची किंमत अनुक्रमे 59 हजार 900 रुपये आणि 60 हजार 723 रुपये आहे.

First Published on May 13, 2019 3:43 pm

Web Title: hero maestro edge 125 launched in india know price and specifications