देशातील सर्वात मोठी टू-व्हिलर उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. नवीन किंमती कंपनीने अधिकृत संकेतस्थळावर अपडेट केल्या आहेत. हीरोच्या बाइक आणि स्कूटर्सच्या किंमतीमध्ये बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत 750 ते 2,800 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

हीरो मोटोकॉर्पची सर्वात लोकप्रिय बाइक स्प्लेंडर प्लसच्या किक स्टार्ट मॉडेलची किंमत 60,350 रुपये आणि सेल्फ स्टार्ट i3S मॉडेलची किंमत 63,860 रुपये झाली आहे. तर, सुपर स्प्लेंडर बाइक ड्रम आणि डिस्क मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. या बाइकची किंमत अनुक्रमे 68,150 रुपये आणि 71,650 रुपये झालीये. स्प्लेंडर आयस्मार्टच्या किंमतीत 800 रुपयांच वाढ झाल्याने या बाइकची किंमत 67,900 रुपये झाली आहे.

पॅशन प्रो, ग्लॅमर आणि एचएफ डीलक्सची किंमत:-
हीरो पॅशन प्रोच्या ड्रम आणि डिस्क मॉडेलची किंमत आता अनुक्रमे 65,740 रुपये आणि 67,940 रुपये झाली आहे. तर, ग्लॅमर ड्रम मॉडेल 69,750 रुपये आणि डिस्क मॉडेल 73,250 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हीरोची सर्वात स्वस्त बाइक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HF Deluxe च्या किंमतीही वाढल्या आहेत. या बाइकच्या ड्रम ब्रेक व्हेरिअंटसाठी आता तुम्हाला 56,675 रुपये आणि डिस्क व्हेरिअंटसाठी 58,000 रुपये मोजावे लागतील.

हीरो स्कूटर्सची किंमत :-
स्कूटर्सच्या किंमतीही कंपनीने वाढवल्या आहेत. हीरो डेस्टिनी 125 स्कूटरच्या अॅलॉय व्हील्स-ड्रम ब्रेक व्हेरिअंटची किंमत 700 रुपयांनी वाढल्याने आता 68,100 रुपये झाली आहे. तर, स्टील व्हील्स-ड्रम ब्रेक व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ झालेली नाही. हे मॉडेल अद्यापही 65,310 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Maestro Edge 125 स्कूटरच्या ड्रम आणि डिस्क मॉडेलची किंमत वाढून अनुक्रमे 69,250 रुपये आणि 71,450 रुपये झाली आहे. तर हीरो प्लेजरच्या सेल्फ स्टार्ट मॉडेलची किंमत 55,600 रुपये आणि प्लेजर अॅलॉय व्हील्स मॉडेलची किंमत आता 57,600 रुपये झाली आहे.

यामध्ये Xtreme 160R, Xtreme 200S, XPluse 200 आणि XPluse 200T या बाइक्सचा समावेश नाहीये. कारण कंपनीने अद्याप यांच्या बीएस-6 मॉडेल्सच्या किंमतीच जाहीर केलेल्या नाहीत.