डॉ. प्रविण कुलकर्णी

बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या अनेकांना विविध आजार, शारीरिक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.त्यातलीच एक समस्या म्हणजे उच्च रक्तदाब. गेल्या काही वर्षांमध्ये नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे उच्च किंवा कमी रक्तदाब असल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार केले पाहिजेत. तसंच जीवनशैलीतही काही बदल करणं गरजेचं आहे.

उच्च रक्तदाब योग्य वेळीच नियंत्रणात आला नाही तर त्यामुळे अनेक विकार मागे लागू शकतात. यात हृदयविकार किंवा अन्य समस्या उद्भवू शकता. मात्र या समस्यांना दूर ठेवायचं असेल तर आहारात आणि जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणं गरजेचं आहे.

१. फास्टफूड टाळा –
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फास्टफूड, जंकफूड, तेलकट,मसालेदार पदार्थांचं सेवन करणं टाळा. त्याजागी सकस आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा. नियमित आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणे गरजेचं आहे. यात धान्य, ताजी फळे, भाज्या आणि कमी फॅट्स असलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा. तसंच स्वयंपाक करताना कच्चे तेल वापरा. मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअमयुक्त फळे व भाज्यांचे सेवन करा, केळी-डाबिंळ, मोसंबी, द्राक्षे, पपई तसेच पालक, टोमॅटो, बीट, मेथी, कांदा, आवळा, लसूण या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

२. आहारात सोडियमचं प्रमाण कमी करा –
आहारात मिठाचा किंवा सोडियमचा अतिरिक्त वापर हे उच्च रक्तदाबाचे एक प्रमुख कारणं आहे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी आहारामध्ये अतिप्रमाणात मीठाचा वापर करणं टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार मिठाचा आहारात समावेश करा. जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने रक्तप्रवाहामध्ये सोडियमचे प्रमाण वाढू शकते आणि मूत्रपिंडांमधून पाण्याची वहन क्षमता कमी होते. यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो.

३. मद्यपान व धुम्रपान टाळा-

मद्यपान म्हणजे उच्च रक्तदाबाला निमंत्रणच. अतिरिक्त मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून मद्यपान, धुम्रपान या गोष्टी टाळा.

वाचा :  उच्च रक्तदाबाची लक्षणे आणि उपाय

४.नियमित व्यायाम करा –

दररोज व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते. त्यामुळे कमीत कमी अर्ध्या तासासाठी व्यायाम करा. चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग आदी व्यायाम करता येतील. आठवड्यातून किमान दोन वेळी तरी वेळातरी वेट ट्रेनिंग करावे. नियमित व्यायाम करूनही वजन कमी होत नसेल, तरी उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी तो फायदेशीर आहे हे लक्षात ठेवावे.

५. तणावाखाली राहू नका –

दैनंदिन जीवनातील ताणतणावामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून आराम करा. आपल्या आवडत्या कामांमध्ये मन रमवा. वाचन करणे, गायन करणे आणि बागकाम करा, अशा कामामध्ये स्वत: ला व्यस्त ठेवा. त्यामुळे इतर चिंता विवंचनेतून तुम्ही काही वेळ दूर रहाल.

(डॉ. प्रविण कुलकर्णी, मुंबईतील ग्लोबल रूग्णालयात वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ आहेत.)