सध्या मद्यपान करण्याला वय राहिलेले नाही. अगदी १८ ते २४ या वयोगटातील अनेक मुले मद्यपान करतात. मात्र या किशोरवयीन मुलांचे मद्यपानाचे व्यसन त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. कारण या मुलांना मद्यपानाच्या सवयीमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे उच्च रक्तदाबासंबंधीचे विकारही जडू शकतात, असा इशारा कॅनडातील संशोधकांनी दिला आहे.

कॅनडा व अमेरिकेतील १८ ते २४ या वयोगटातील १०पैकी चार मुले मद्यपानाच्या आहारी गेलेली आहेत. अन्य देशांतही अशाच प्रकारची स्थिती आहे. कॅनडातील मॉनट्रेल हॉस्पिटल रिसर्च सेंटर (सीआरसीएचयूएम) विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले. त्यासाठी या वयोगटातील मद्यपान करणाऱ्या ७५६ मुलांचे आरोग्य आणि रक्तदाब तपासण्यात आला. त्यापैकी अनेकांचा रक्तदाब उच्च असल्याचे दिसून आले.

स्टायलॉस्टिक रक्तदाबात (हृदय स्नायूचे आकुंचन) हृदयाचे ठोके पडताना रक्तवाहिन्यांवर ताण पडल्यानंतर पारा हा १४० मिलीमीटरपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तर ९० पेक्षा कमी पण १४० पेक्षा वर पारा गेल्यास ते उच्च रक्तदाबाचे लक्षण ठरते.

तर डॉयलॉस्टिक रक्तदाबात रक्तवाहिन्या आणि हृदयाचे ठोके याच्या मोजमापात (हृदयातील ठोके आणि रक्ताभिसरण क्रियेदरम्यान) रक्तवाहिन्या संथ होत असल्याचे दिसून आले.

सीआरसीएचयूएमच्या जेनिफेर ओ-लोगुलिन यांच्या म्हणण्यानुसार, २० ते २४ वयोगटातील मुलांचा रक्तदाबाचा पारा (मक्र्युरी) हा मद्यपान न करणाऱ्या मुलांच्या तुलनेत २ ते ४ मिलीमीटरने वाढल्याचे दिसून आले आहे. यावरून हेच सिद्ध होते की, मद्यपान करणाऱ्या चारपैकी एका मुलामध्ये उच्च रक्तदाबाशी निगडित निकष (स्टायलॉस्टिक रक्तदाबात पारा १२० ते १३९ मिलीमीटरच्या दरम्यान) दिसून आले. ही परिस्थिती धोक्याची पूर्वसूचना देणारी असून सातत्याने होणारी वाढ उच्च रक्तदाबासोबत हृदयरोग आणि अकाली मृत्यूलादेखील जबाबदार ठरू शकते. त्याचबरोबर वयाच्या विसाव्या वर्षांपासून अतिमद्यपान करणारे ८५ टक्के तरुण ३४व्या वर्षांपर्यंत त्यात सातत्य ठेवत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)