अति प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे कर्करोगाच्या पेशी अधिक सक्रिय होत असून, त्यामुळे टय़ुमर अधिक प्रमाणात शरीरात पसरत असल्याचे संशोधकांना आढळले आहे.

नऊ वर्षे चाललेल्या या संशोधनामध्ये याबाबतचा शोध लागला आहे.  कर्करोग संशोधनातील एक महत्त्वपूर्ण यश असल्याचे मानले जात आहे.

व्हॅल्म्स इन्स्टिटय़ूट वूर बायोटेक्नोलॉजी, कॅथोलिके युनिव्हर्सिटी लिऊन आणि व्हर्जी युनिव्हर्सिटी ब्रुसेलच्या संशोधकांनी साखरेमुळे कशा प्रकारे कर्करोगाच्या पेशींची झपाटय़ाने वाढ होते आणि टय़ुमरच्या वाढीसाठी साखर कशा प्रकारे उत्तेजित करते याबाबतचे संशोधन केले.

या शोधामुळे साखर आणि कर्करोग यांच्यामध्ये सहसंबंध असल्याचे सकारात्मक पुरावे दिले आहेत.

यामुळे कर्करोग पीडितांसाठी बनविलेल्या आहारामुळे नेमका कर्करोगावर काय परिणाम होतो आणि आहार काय असावा याबाबतच्या संशोधनाला वाव मिळणार आहे.

आमचे संशोधन अतिप्रमाणात साखर खाल्ल्यामुळे कर्करोगांच्या पेशी कशा प्रकारे वाढतात याबाबत आहे. या दोन्हींचा परस्परसंबंध आहे.

आमच्या संशोधनामुळे भविष्यातील कर्करोगासंबंधीच्या संशोधनाला मोठी चालना मिळणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.