युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्रांच्या सर्वेक्षणातील माहिती                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       आशिया-प्रशांत क्षेत्रातील युवा वर्गात एचआयव्ही-एड्सचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात होत असल्याची माहिती युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्रांच्या सर्वेक्षणात उघड झाली आहे. भारत, चीन आणि पाकिस्तान यांसह अनेक देशांमध्ये अनेक तरुणांना गुप्तरोग व एड्सची लागण होत असल्याची माहिती या संस्थांनी तयार केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.
आशिया-प्रशांत क्षेत्रातील ‘युवावर्गासमोरील एचआयव्ही/ एडस्बाबतची आव्हाने’ या मथळ्याखाली या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या सर्वेक्षणानुसार २०१४ मध्ये आशिया-प्रशांत क्षेत्रातील १० ते १९ वर्षे वयोगटातील जवळपास दोन लाख २० हजार युवावर्गाला एड्सची लागण झाली. यापैकी भारतातच हे प्रमाण ९८ टक्के आहे.
कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, म्यानमार, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, फिलिपिन्स, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमध्येही एड्सचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होत आहे. याशिवाय मुंबई, हानोई, जाकार्ता, बँकॉक, चिआंग माय या शहरांमध्ये एड्सबाधित तरुणांची संख्या जास्त आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
जागतिक एड्स दिनानिमित्ताने मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात एड्सबाधितांची संख्या जास्त आहे. अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील शरीरविक्रय करणाऱ्या महिला लैंगिक आजार होऊ नये यासाठी कोणतीही सुरक्षा साधने वापरत नाहीत. त्यांच्यामध्ये एचआयव्ही-एड्स होण्याचे प्रमाणही अधिक आहे, असे हा अहवाल सांगतो.
विशेष म्हणजे समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक आहे. इंजेक्शनद्वारे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाण होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतात समलैंगिक संबध ठेवणाऱ्या (गे) पुरुषांमध्ये एड्सचे प्रमाण ३.५ टक्के आहे, अशी माहिती या अहवालात आहे.