पीआरईपीचा वापर
भारतातील सर्वात मोठी वेश्यावस्ती असलेल्या पश्चिम बंगालमधील सोनागाची जिल्ह्य़ात पुढील महिन्यात एचआयव्ही प्रतिबंधक गोळ्या वेश्यांना दिल्या जाणार आहेत. देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. एचआयव्ही विषाणूमुळे एड्स हा रोग होत असतो. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांनी हा प्रकल्प मंजूर केला असून तो डिसेंबरमध्ये सुरू होईल. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एड्स होतो.
नॅकोचे प्रमुख अधिकारी बी.बी.रेवारी यांनी सांगितले की, या प्रकल्पाला अलीकडेच मंजुरी मिळाली असून देशात असा प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जात आहे. प्री एक्सपोजर प्रोफॅलॅक्सिस या प्रकल्पात एचआयव्ही निगेटिव्ह असेलल्या वेश्यांना नियमित एडस प्रतिबंधक औषधे दिली जातील. एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीशी शरीरसंबंध आल्यास स्त्रियांनाही एचआयव्हीची लागण होते. एचआयव्हीला प्रतिबंध करणारे औषध नवीनच असल्याचे सोनागाची संशोधन प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य समराजित जाना यांनी सांगितले. ‘मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ने या प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली आहे. दरबार महिला समन्वय समितीने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये १ लाख ३० हजार वेश्या आहेत. एचआयव्हीवरील पीआरईपी हे औषध रोज या जिल्ह्य़ातील वेश्यांना दिले जाणार असून त्यांमुळे त्यांना एचआयव्हीची लागण होणार नाही. कंडोममुळे एचआयव्हीची लागण कमी होते, पण नेहमी ग्राहक कंडोम वापरतातच असे नाही व काहीवेळा कमी दर्जाचे कंडोम फाटतात. त्यामुळे एचआयव्हीची लागण होते; हे सगळे या औषधामुळे टाळता येईल. पीआरईपी या औषधाने एचआयव्हीची लागण ६०-७० टक्क्य़ांनी कमी होईल. एड्स सोसायटी ऑफ इंडियाने या प्रकल्पाचे स्वागत केले असून त्यामुळे एडसची जोखीम कमी होणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर पीआरईपी औषध धोरणात्मक पातळीवर वापरले जाणार आहे. परदेशात हे औषध व त्याच्या जोडीला कंडोमचा वापर यामुळे एचआयव्हीचे प्रमाण कमी झाले आहे. सोनागाची येथील एचआयव्हीग्रस्त २०००० वेश्यांपैकी १००० एचआयव्ही निगेटिव्ह वेश्यांवर या औषधाचा वापर केला जाणार आहे. त्याआधी या वेश्यांची रक्तचाचणी केली जाणार असून दर तीन महिन्यांनी पुन्हा रक्त तपासले जाईल. गोळ्या सुरू केल्यानंतर तीन आठवडय़ांनी एचआयव्हीविरोधी क्षमता तयार होते. दोन वर्षांनी या प्रकल्पाचे निष्कर्ष जाहीर करणारा अहवाल तयार केला जाईल.