तुम्ही एप्रिल २०१६ च्या आधी गृहकर्ज घेतले आहे? याचे उत्तर जर हो असेल, तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्यांनी एप्रिल २०१६ पूर्वी गृहकर्ज घेतले होते त्यांना व्याजदर कमी झाल्याचा फायदा होत नसल्याची तक्रार अनेक कर्जदारांकडून येत होती. त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरबीआयने सर्व बँकांना पत्र पाठवले असून एप्रिल २०१६ च्या आधी गृहकर्ज घेतलेल्यांना कमी व्याजदर भरावा लागणार आहे. हा नियम १ एप्रिल २०१८ पासून लागू होणार असल्याचे यामध्ये म्हणण्यात आले आहे.

बँकांमधील प्रमाण व्याजदर हा एप्रिल २०१६मध्ये ११.२३ टक्के होता. तो कमी होऊन डिसेंबर २०१७ पर्यंत १०.२६ पर्यंत आला होता. मात्र एप्रिल २०१६ मध्ये ज्या ग्राहकांनी कर्ज घेतले आहे त्यांना या कमी झालेल्या व्याजदराचा फायदा इतका झाला आहे. याआधी आरबीआयने व्याजदरात कपात केली तरी त्याचा फायदा ग्राहकांना न मिळता बँकांना होत होता. मात्र आता तसे होणार नसून आरबीआयच्या निर्णयाचा फायदा थेट ग्राहकांना मिळू शकणार आहे. या निर्णयाचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळावा यासाठी आरबीआय प्रयत्नशील आहे.