News Flash

सर्दी-खोकला झालाय? हे उपाय करुन पाहा

घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय

पावसाळा सुरु झाला की आपल्याला आल्हाददायी वाटतेच, कारण उकाड्यापासून काहीशी सुटका झालेली असते. पण या वातावरणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना घसा खवखवणे, सर्दी, डोकेदुखी, ताप अशा समस्या सुरु होतात. कालांतराने याचे रुपांतर संसर्गजन्य आजारात होते. अचानक उद्भवलेल्या या समस्या वातावरणातील बदलाने झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच समजते. यामध्ये पावसात भिजणे, दमट हवामान, अस्वच्छ पाणी, बाहेरचे अन्न खाल्ल्याने होणाऱ्या आजारांचा समावेश असतो. यावर डॉक्टरांकडे जाणे हा उपाय आहेच, पण औषधे घेण्याआधी काही सोपे घरगुती उपाय करुन पाहिल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात असेच काही सोपे उपाय…

१. पाणी उकळून, गाळून स्वच्छ करून प्यावे.

२. ऑफिसला जाताना मोजे/ कपडय़ांचा जास्तीचा जोड घेऊन जावा. ओल्या कपडय़ांत बसणे टाळावे. अंग व केस पुसण्यास एखादा नॅपकीनही बाळगावा.

३. शक्यतो चप्पल किंवा पूर्ण बंद असलेली सँडल घालावी.

४. पुरणपोळी, भजी, वडे, ब्रेड, बासुंदी अशा जड पदार्थाचे सेवन टाळावे किंवा असे पदार्थ खाल्ले तरी कमी प्रमाणात खावेत. दुधाची मिठाईसुद्धा जपून खावी.

५. तिखट पदार्थाना आलं, सूंठ, जिरं, मिरीपूड यांची जोड द्यावी.

६. गोड पदार्थाना जायफळ, वेलची पूड (छोटी व बडी वेलची), लवंग अशा पदार्थाची जोड द्यावी.

७. रोज रात्री खालीलप्रमाणे काढा करून गरम गरमच घ्यावा. आले-काळी मिरी- दालचिनी-हळद पाण्यात उकळून काढा करावा. गाळून त्यात थोडा गूळ घालून प्यावे. यामुळे सर्दी-खोकला-अंगदुखी अशा तक्रारींना आळा बसतो आणि लवकर बरे वाटते.

८. जेवणानंतर रोज खालील सुपारी खावी.
बडीशेप-ओवा-काळे जिरे-ज्येष्ठमध-जायफळ पूड खाताना त्यामध्ये थोडे काळे मीठ घालून खावी. मीठ त्यात घालून ठेवू नये.

९. जेवणात सूप/ डाळीचे कढण/ भाताची पेज/ कोकम सार/ ताकाची कढी असे पातळ व गरम पदार्थ नेहमी समाविष्ट करावेत.

१०. जखम झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन इलाज करणं गरजेचं आहे.

११. घरात कीटकनाशकांचा फवारा मारून घ्यावा. अन्यथा रोज लसूण व कांद्याची सालं घरात जाळून धूर करावा. याने डास कमी होतात.

१२. शिळे/ उघडय़ावरील अन्न खाऊ नये. हलका आहार घ्यावा. उष्ण पदार्थ खावेत.

१३. रुमालात ओव्याची पुरचुंडी बांधून नेहमी जवळ बाळगावी. सर्दी-खोकला-डोकेदुखी वाटू लागल्यास पुरचुंडी चुरून त्याचा सतत वास घेत राहावा. रात्री झोपताना सूंठ व वेखंड (१:४ प्रमाण) याचा लेप कपाळावर लावावा.

१४. दोन दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा ताप, उलटय़ा व जुलाब अंगावर काढू नये. डॉक्टरांचा वेळेवर सल्ला घ्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 7:59 pm

Web Title: home remedies for cough and cold in rainy season
Next Stories
1 व्याज दर वाढतात तेव्हा काय करावे?
2 Xiaomi Redmi Y2 बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
3 Monsoon Trekking : ट्रेकिंगला जाताय? ‘या’ गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा
Just Now!
X