सुंदर, नितळ आणि उजळ त्वचा असावी असं प्रत्येक तरुणीची, स्त्रीची इच्छा असते. परंतु, वातावरणातील बदल आणि आहारातील बदल यामुळे आपल्या त्वचेवर थेट परिणाम होत असतो. परिणामी, अनेक वेळा चेहऱ्यावर पुटकुळ्या, फोडं, ब्लॅकहेड्स किंवा व्हाइटहेड्स येतात. अनेक उपाय केल्यामुळे किंवा महागडे सौंदर्य प्रसाधने वापरल्यानंतरही या समस्यांपासून सुटका होत नाही. त्यामुळे या समस्येवर घरगुती उपाय करुन पाहणं कधीही फायदेशीर ठरतं. घरगुती उपाय केल्यामुळे कोणतेही घातक परिणाम होत नाही. तसंच त्वचेला इजाही पोहचत नाही. त्यामुळे शक्यतो घरगुती उपायच करावेत.

सध्याच्या काळात अनेक तरुण-तरुणी ब्लॅकहेड्सच्या समस्येने त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. अनेक जणांना नाकावर किंवा नाकाजवळील भागात ब्लॅकहेड्स किंवा व्हाइटहेड्स होतात. परंतु, प्रत्येक वेळी ब्युटीपार्लर किंवा अन्य साधनांचा वापर करुन या समस्येपासून सुटका मिळत नाही. अशा वेळी काही घरगुती पदार्थांचा वापर करुन आपण या समस्येपासून दूर राहू शकतो. चला तर मग पाहुयात ब्लॅकहेड्स घालविण्याचे काही घरगुती उपाय.-

१. बेकिंग सोडा आणि लिंबू –
घरात सहज उपलब्ध होणाऱ्या लिंबू आणि बेकिंग सोड्याच्या मदतीने आपण ब्लॅकहेड्सची समस्या दूर करु शकतो. यासाठी एक लिंबू घेऊन ते मधोमध चिरा. यातील एका फोडीवर बेकिंग सोडा टाकून ते लिंबू चेहऱ्यावर आणि ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी चोळा. तसंच ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी काही वेळ ते लिंबू तसंच दाबून ठेवा. पाच- सहा मिनीटे या लिंबाने चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धूवा. हा प्रयोग आवड्यातून दोन ते तीन वेळा करा.

२. टोमॅटो – अनेक वेळा टोमॅटोच्या रसाचा स्क्रब म्हणून सुद्धा वापर केला जातो. तसंच त्याचा उपयोग ब्लॅकहेड्स काढण्यासाठीही करता येतो. टोमॅटोचा रस काढून तो चेहऱ्याला लावा आणि ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी या रसाने मसाज करा.

३. दालचिनी –
एक चमचा दालचिनीची पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, १ चमचा लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावा. हा प्रयोग आठवड्यातून २ ते ३ वेळा करा.

४. गुलाबपाणी –
१ लहान चमचा मीठ आणि गुलाबपाणी मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्यावर मसाज करा. हा प्रयोग आठवड्यात २ ते ३ वेळा करा.

५. कोरफडचा रस –

अनेक त्वचाविकारांवर कोरफड गुणकारी आहे. तसंच ब्लॅकहेड्स घालविण्यासाठीदेखील तिचा वापर केला जातो. यासाठी कोरफडच्या रसात हळद मिक्स करुन हा लेप ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावावा. त्यानंतर १५-२० मिनीटे तो तसाच चेहऱ्यावर वाळू द्यावा. हा लेप वाळल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर एखाद्या उत्तम ब्रॅण्डचं मॉश्चराइजर लावावे.

( कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)