पंचवीस एक वर्षांपूर्वी चीनमधल्या हाऊटुवान गावात शेकडो लोक राहत होते. पण हळूहळू गावातील लोक पोटापाण्यासाठी गावाबाहेर पडू लागले. जे गाव सोडून निघून गेले ते पुन्हा कधीही परतले नाही. गाव ओस पडू लागलं, लोक आपलं घरही पाहायला येईनासे झाले. अखेर ज्या घरांकडे माणसांनी पाठ फिरवली त्याच घरांना निसर्गानं ‘घरपण’ दिलं आणि आपल्यात सामावून घेतलं.

काही वर्षांपूर्वी एका स्थानिक छायाचित्रकाराच्या नजरेस ही जागा पडली. ओसाड पडलेल्या या गावाला निर्सगानं आपलंसं केलेलं पाहून एक क्षण त्याची निराशा कुठच्या कुठे पळाली. हे सारंच कलात्मक दिसत होतं. गावातील प्रत्येक घरांवर चढलेल्या वेली, सगळीकडे उगवलेलं गवत, गावाचं जंगलात झालेलं रुपांतर हे सगळंच पाहून प्रथमदर्शी भीती वाटतं असली तरी यातही सौंदर्य लपलं असल्याची जाणीव या छायाचित्रकाराला झाली मग काय त्यानं याचे फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड केले अन् अल्पावधीत विस्मरणात गेलेलं हे हाऊटुवान गाव प्रसिद्ध झालं.

फार पूर्वी या गावात २ हजारांहून अधिक लोक राहायचे. तर जवळपास पाचशे लहान मोठी घरं गावात होती. पण कामानिमित्त अनेकजण गाव सोडून शहरांकडे वळू लागली. जे लोक गाव सोडून गेले ते परत कधीही आले नाहीत. पूर्वी पाचशे घर असलेल्या या गावात आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच घरांत लोक राहत आहेत. बाकी शेक़डो घरांवर रानवेली, गवत वाढलं आहे, गावाचं रुपांतर जंगलात झालं आहे. जरी घरांवर शेवाळं, गवत, वेली वाढल्या असल्या तरी या गावाचं सौंदर्य मात्र अधिक खुलून दिसत आहे त्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी का होईना गावाकडे वळत आहेत.