होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडियाच्या भारतातील नव्या मिडलवेट स्पोर्टबाइक होंडा CBR650R ची डिलिव्हरी अखेर भारतात सुरू झाली आहे. सध्याच्या CBR650F या बाइकची जागा ही नवी बाइक घेईल. ही गाडी दोन नव्या रंगांमध्ये (ग्रँड प्री रेड आणि मॅट गनपाउडर ब्लॅक )उपलब्ध असणार आहे. 7.70 लाख रुपये इतकी या बाइकची एक्स शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे. ही बाइक अनेक नव्या अपडेट्ससह कंपनीने लाँच केली आहे.

या नव्या बाइकची डिझाइन कंपनीच्या CBR 1000RR फायरब्लेडशी प्रेरित आहे. चेसिस, फ्युअल टँक आणि फुटरेस्ट देखील बाइकमध्ये नवीन असून जुन्या बाइकच्या तुलनेत ही बाइक वजनाने 6 किलोने हलकी आहे. बाइकच्या पुढील भागात शोवा सेपरेट फोर्क फंक्शन यूएसडी फोर्क्स आणि मागील भागात मोनोशॉक सस्पेंशन आहे. याशिवाय पुढील भागामध्ये ड्युअल–रेडिअल माउंट क्लिपर आणि मागील बाजूला सिंगल–पिस्टन क्लिपर असून उत्तम ब्रेकिंगसाठी डिस्क ब्रेक्स आहेत. तसंच बाइकमध्ये ड्युअल–चॅनल एबीएस आहे.

या बाइकमध्ये कंपनीने 649cc चं लिक्विड–कुल्ड, इन–लाइन चार–सिलिंडर इंजिन दिलं असून हे इंजिन 94 bhp पावर आणि 64 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. बाइकच्या इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. बाइकमध्ये ड्युअल LED हेडलँप आणि डिजिटल LCD डिस्प्लेसह गिअर पोझिशन इंडिकेटर्स आणि शिफ्ट अप इंडिकेटर्स आहेत. भारतीय बाजारात कावासाकी निंजा 650, ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल एस आणि सुझुकी GSX-S750 यांसारख्या गाड्यांशी या बाइकची टक्कर असण्याची शक्यता आहे.