गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या करोना महामारीचा परिणाम अद्यापही संपूर्ण जगावर कायम आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मास्क घालणं प्रत्येकासाठी नित्याचीच बाब झालीये. पण तुम्ही एखाद्या कारवर मास्क घातलेलं पाहिलंय का?…नसेल तर आता लवकरच हे चित्रंही दिसू शकतं. कारण जपानची कार कंपनी होंडाने हे करुन दाखवलंय. होंडाने Kurumaku चा वापर केलाय. Kurumaku म्हणजे एक खास आणि अतिरिक्त सुरक्षा आवरण आहे. हे आवरण धोकादायक व्हायरसला दूर ठेवतं.

Kurumaku ला होंडा अ‍ॅक्सेसने डेव्हलप केलं असून यामुळे तुमच्या गाडीच्या कॅबिनची हवा अत्यंत स्वच्छ राहते आणि धोकादायक व्हायरसपासून बचाव होतो, अशी माहिती होंडाकडून एका निवेदनाद्वारे देण्यात आली. Kurumaku ला एअर क्लीन फिल्टरच्या टॉपवर लावता येईल. त्यामुळे गाडीत हवेचं सर्क्युलेशन झाल्यास Kurumaku द्वारे सर्व व्हायरसपासून बचाव होतो. यामध्ये झिंक फॉस्फेट केमिकल कन्वर्जन ट्रीटमेंटचा वापर करण्यात आला आहे, गाडीवर गंज लागू नये यासाठीही याचा फायदा होता.

केबिन पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि 99.8 टक्के व्हायरसचा खात्मा करण्यासाठी या संपूर्ण प्रक्रीयेला जवळपास 15 मिनिटे लागतात. कुरुमाकुला एका नव्या N-बॉक्समध्ये फिट केलं जाईल कारण आतापर्यंतच्या सर्व एअर फिल्टरसाठी कुरुमाकु फिट बसत नाही. त्यामुळे वेगळ्या लाइनअपमधल्या गाड्यांमध्ये याचा वापर केला जाईल असं होडाकडून सांगण्यात आलंय. हे आवरण दरवर्षी किंवा दर 15,000 किलोमीटरनंतर बदलावं लागेल. Kurumaku चा होंडाच्या अधिकृत अ‍ॅक्सेसरी लाइनअपमध्ये समावेश करण्यात आला आहे.