ऑटोमोबाइल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी होंडाने आपल्या कार्सवर सवलत जाहीर केली आहे. एप्रिल महिन्यात अपेक्षित विक्री न झाल्याने कंपनीकडून ग्राहकांना डिस्काउंट दिलं जात आहे. विक्री वाढावी या हेतूने कंपनीकडून आपल्या अनेक मॉडल्सवर सूट दिली जात आहे. यानुसार कंपनी होंडा अमेझ, होंडा सिटी, बीआर-व्ही, जॅझ, सीआर-व्ही, डब्ल्यूआर-व्ही, Honda Brio अशा कार्सवर 2 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळत आहे.

जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सवलत –
Honda CR-V : या कारच्या डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हेरिअंट्सवर कंपनीकडून सवलत दिली जात आहे. 1.25 लाख रुपये ते 2 लाख रुपयांपर्यंतची सवलत किंवा लाभ कंपनीकडून देण्यात येत आहे. 2004 पासून ही कार भारतीय बाजारात आहे.

Honda BR-V : एमपीव्ही अर्थात मल्टी पर्पज व्हेईकल प्रकारातील या कारवर कंपनीकडून एकूण 1.10 लाख रुपयांची सवलत मिळेल. मारुतीच्या Ertiga कडून या कारसमोर आव्हान निर्माण झालंय.

Honda City : कंपनीची ही कार सर्वाधिक लोकप्रिय कारपैकी एक आहे. ही कार 1998 मध्ये सर्वप्रथम लाँच करण्यात आली होती. प्रतिस्पर्धी कंपन्यांना आव्हान देण्यासाठी या कारवर कंपनीकडून 57 हजार रुपयांची सवलत देण्यात येत आहे.

Honda Jazz : या कारवर कंपनीकडून 45 हजार रुपयांपर्यंत सवलतीची ऑफर आहे. भारतीय बाजारात या कारची टक्कर मारुतीच्या बलेनो आणि ह्युंडाई i20 या कारशी आहे.

Honda WR-V : कंपनीकडून या कारवर 45 हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली जात आहे. या कारमध्ये 90bhp, 1.2 लिटर पेट्रोल आणि 100hp, 1.5 लिटर डीजल इंजिनचा पर्याय आहे.

Honda Brio : या कारचं उत्पादन थांबवणार असल्याची घोषणा कंपनीने यावर्षीच केली आहे. त्यामुळे स्टॉक संपवण्यासाठी डिलर्सकडून या कारवर 40 हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे.

Honda Amaze : कंपनीच्या या कारवर 37 हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन अशा दोन्ही मॉडल्सवर ही सवलत डिलर्सकडून मिळेल.