Honor कंपनीने नुकतेच पाच नवीन प्रोडक्ट भारतीय बाजारात लाँच केले आहेत. यामध्ये Honor 9X स्मार्टफोनपासून Honor Watch Magic 2, Band 5i आणि दोन ब्लूटूथ इअरफोनचा समावेश आहे. आता कंपनी भारतात लवकरच लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही आणायच्या तयारीत आहे. या तिमाहीच्या अखेरपर्यंत लाँचिंगबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने चीनमध्ये आपला पहिला स्मार्ट टीव्ही Honor Vision लाँच केला होता, या टीव्हीचं खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पॉप-अप कॅमेरा दिलाय. हा टीव्ही भारतात यावर्षी लाँच केला जाणार आहे. हा टीव्ही म्हणजे कंपनीची ऑपरेटिंग सिस्टिम HarmonyOS चा सपोर्ट असलेले पहिलेच प्रोडक्ट असेल. याशिवाय कंपनी भारतात ऑनर मॅजिग बुक लॅपटॉपही आणणार आहे. सुरुवातीला याची ऑनलाइन विक्री करण्यात येईल. ऑनर ९एक्स च्या लाँचिंगदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीतल ऑनर इंडियाचे अध्यक्ष चार्ल्स पेंग यांनी ही माहिती दिली. आम्ही सुरुवातीला भारतात लॅपटॉप घेऊन येत आहोत. भारतीय ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी हा लॅपटॉप आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. टीव्हीसोबत दर्जेदार कंटेट मिळावे यासाठी सध्या हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स यांसारख्या कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत, असेही पेंग म्हणाले.