हल्ली कोणताही स्मार्टफोन हा अधिकाधिक स्मार्ट कशावरून ओळखला जातो तर त्या मोबाइलचा कॅमेरा किती आधुनिक आहे यावरून. किंबहुना मोबाइलच्या इतर कार्यप्रणालीपेक्षा मोबाइल किती आणि कसा अधिक कार्यक्षम आहे हेच पाहण्याकडे अधिक कल आहे. आजच्या तरुणाईला मोबाइलमधली कॅमेरा कॅपॅसिटी जास्त महत्त्वाची वाटते त्यामुळेच ऑनर कंपनीने नुकत्याच बाजारात आणलेल्या ‘ऑनर सिक्स्टी सेव्हन’ या फोनची प्रसिद्धी या कॅमेऱ्यावरच केली जात आहे. अर्थातच सध्याच्या बाजारपेठीय गणितानुसार हेच समीकरण महत्त्वाचे असल्याचे ऑनरच्या सर्वेक्षणातदेखील दिसून आले आहे. त्यामुळेच हा तरुण ग्राहक डोळ्यासमोर ठेवून ऑनरचे हे नवे उत्पादन आता जागतिक बाजारात नुकतेच उतरलेले दिसून येते. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे आलेल्या काही मोबाइलची जाहिरात ही थेट त्यांच्या कॅमेऱ्यावरच केलेलीहोती. आणि कॅमेऱ्याची जाहिरात करण्याचा मोह अगदी आय फोनला देखील आवरता आलेला नव्हता. ‘हुवेई’ या कंपनीचे तंत्रज्ञान वापरून ऑनरने मागील वर्षी मोबाइलच्या कॅमेऱ्यांमध्ये नवनवीन प्रयोग केले होते.

मागील बाजूस एका ऐवजी दोन कॅमेरे हे नवीन तंत्रज्ञान ऑनरने मागील वर्षी ‘हुवेई पी नाईन’ आणि ‘ऑनर पी एट’ मॉडेलच्या माध्यमातून बाजारात आणले. मात्र हा मोबाइल किमतीच्या बाबतीत वरच्या वर्गात मोडणारा होता. तेच आता ऑनरने थेट परवडणाऱ्या किमतीत आणून मोबाइलच्या विक्रीतील कॅमेऱ्याचे स्थान आणखीनच अधोरेखित केले असे म्हणता येईल. मागील बाजूस असणारा दुहेरी कॅमेरा हा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा म्हणता येईल. १२ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेऱ्यावर छायाचित्रणाची मुख्य जबाबदारी पेलली आहे. तर २ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा हा ऑब्जेक्टची खोली व्यवस्थित टिपतो. त्यामुळे अगदी व्यावसायिक कॅमेऱ्याने टिपले जाणारे – पार्श्वभूमी  ब्लर करून केवळ ऑब्जेक्ट हायलाइट करणारे छायाचित्र ऑनरच्या या मोबाइलने मिळवता येते. इतकेच नाही तर फक्त मुख्य ऑब्जेक्ट रंगीत आणि इतर कृष्णधवल असे प्रयोग देखील करता येतात. त्याचबरोबर अतिशय गडद रंगांची खोलीदेखील व्यवस्थित टिपली जाते.

VIDEO: नोकिया पी १ स्मार्टफोनचे फीचर्स लीक, जाणून घ्या काय आहे नवीन?

कॅमेऱ्यातील हे वेगवेगळे प्रयोग इतपतच हा मोबाइल मर्यादित नाही हे मात्र येथे नमूद करावे लागेल. कारण हल्लीची तरुणाई कॅमेऱ्याबरोबरच मोबाइलच्या अंतर्गत स्टोरेजला देखील महत्त्व देताना दिसते.

अधिकाधिक अ‍ॅप डाउनलोड करता यावेत यासाठी अशा स्टोरेजची गरज असते. तर जास्तीत जास्त रॅम (रॅन्डम अ‍ॅक्सेस मेमरी) देखील महत्त्वाचा असतो. थ्री जीबी रॅमबरोबर ३२ आणि ६४ जीबी मेमरीची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. ऑनरचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे कंपनीच्या दाव्यानुसार हे तंत्रज्ञान भारतातच विकसित करून त्याचे उत्पादनदेखील भारतातच केले जाते. मात्र सध्यातरी हे उत्पादन चीनमध्ये केले जात असून फेब्रुवारीपासून ते भारतात सुरू होईल.

अर्थात इतक्या साऱ्या सुविधा दिल्यानंतर किंमत वाजवी ठेवणे हे तसे कठीण असते. पण सध्याच्या लोकप्रिय मोबाइलच्या मॉडेलच्या किमती या दहा ते १५ हजार या रेंजमध्ये आहेत. ऑनरने हीच मर्यादा सांभाळत ऑनर सिक्स्टी सेव्हन ३२ जीबीसहीत १२ हजार ९९९ रुपयांना तर ६४ जीबी १५९९९ रुपयांना बाजारात आणला आहे. अर्थातच अशा किमतीत नवीन फिचर्स असल्यामुळे लवकरच बाजारात इतत ब्रँड्स त्यांची उत्पादनंही उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही

डिस्प्ले – १३.९७ सेंमी पूर्ण एचडी

मागील कॅमेरा – १२ मेगापिक्सेल + टू मेगा पिक्सेल

पुढील कॅमेरा – ८ मेगापिक्सेल

रंग – सोनेरी, चंदेरी, करडा

मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर.

सौजन्य- लोकप्रभा