हॉटेलमध्ये जाऊन जेवणे ही आता कधीतरी करण्याची गोष्ट राहिलेली नाही. शहरातील अनेक लोक अनेकदा हॉटेलमध्ये जेवण घेत असतात, भले त्यात अपरिहार्यता असेल किंवा हॉटेलचे खाणे त्यांच्या पचनी पडत असेल, पण प्रत्यक्षात मात्र हॉटेलमध्ये जेवण्याने आपण जादा दोनशे उष्मांक घेत असतो.
घरात जेवताना मात्र आपण एवढे उष्मांक जेवणातून घेत नाही असे नवीन अभ्यासातून दिसून आले आहे. घरचे अन्नच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. प्रौढांसाठी फास्ट फूड किंवा हॉटेल व रेस्तरॉमधील अन्न हे उष्मांक (कॅलरी), शर्करा व संपृक्त मेद व सोडियम वाढवणारे असते. सोडियममुळे रक्तदाब वाढतो हे वेगळे सांगायला नको. अभ्यासात असे दिसून आले, की रेस्तराँमध्ये गेल्यानंतर आपण फास्ट फूड किंवा पूर्ण जेवण घेतले तरीही दोनशे उष्मांक जास्त घेतो. यापूर्वीच्या अभ्यासात असे दिसून आले होते, की फास्ट फूड खातानाच आपण जास्त उष्मांक घेतो व त्यात मेद व सोडियमही असते.
भाज्या व व्हिटॅमिनयुक्त अन्न व फळे यांसारखे अन्न घेणाऱ्यांच्या तुलनेत ते जास्त उष्मांक घेतात असे दिसून आले होते. आताच्या अभ्यासानुसार हॉटेलमध्ये फास्ट फूडच नव्हेतर पूर्ण जेवण घेणारे लोक जास्त उष्मांक घेत असतात. अमेरिकी कॅन्सर सोसायटीचे बिन टी न्युगयेन व शिकागोच्या इलिनॉइस विद्यापीठाच्या लिसा एम पॉवेल यांच्या अभ्यासात २० ते ६४ वयोगटातील १२ हजार व्यक्तींनी दिलेली माहिती तपासण्यात आली. त्यांनी फास्ट फूड  व पूर्ण जेवण देणाऱ्या हॉटेलना दोन दिवसांत केव्हा व किती वेळा भेट दिली याची माहिती घेण्यात आली. त्यात असे दिसून आले, की हॉटेलमधील जेवणाने उष्मांक १९४.९४ किलोकॅलरी मिळतात व संपृक्त मेद (३.४८ ग्रॅम), साखर (३.९५ ग्रॅम) सोडियम (२९६.३८ मिलिग्रॅम) एवढे घटक शरीरात जातात. हॉटेलमध्ये पूर्ण जेवण घेतल्यास २०५.२ किलोकॅलरी उष्मांक घेतले जातात व त्यात संपृक्त मेद २.५२ ग्रॅम व सोडियम ४५१.०६ मिलिग्रॅम एवढे घटक शरीरात जातात.
आमच्या संशोधनानुसार प्रौढ व्यक्ती या फास्ट फूड किंवा पूर्ण जेवण हॉटेलमध्ये अनेकदा घेतात व त्यामुळे त्यांच्या शरीरात उष्मांक वाढतात. चांगल्या आहारसवयींच्या दृष्टीने ते घातक आहे. पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.