वाढतं वजन हा अनेकांसाठी न सुटणारा प्रश्न बनला आहे. वजन कमी करण्याची बऱ्याचजणांची इच्छा असूनही आळस आणि आवश्यक जिद्दीअभवी हे म्हणजे धर्मसंकट. अनेकांच्या दृष्टीने जवळपास अशक्य असणाऱ्या या संकटावर मात करत मुंबईत राहणाऱ्या व्यावसाय़िक अभिषेक होरिलाल चौहान यांनी दोन महिन्यांत २५ किलो वजन कमी करुन दाखवले. १८ वर्षांचे असताना अभिषेक यांचे वजन सुमारे १०० किलो इतके होते. यासाठी त्यांनी मनाअभावी विविध उपाय, व्यायाम वगैरेही करुन पाहिले, ज्याचा काहीच परिणाम झाला नाही. पण, कौटुंबिक समारंभात याच वाढत्या वजनामुळे त्यांची वारंवार थट्टा केली गेली आणि ही एक घटना त्यांची शमलेली जिद्द पुन्हा एकदा जागवून गेली. या थट्टेचं प्रत्युत्तर अभिषेक यांनी कृतीतून देण्याचे ठरवले. अभिषेकने पुन्हा व्यायामशाळेत जाण्यास सुरुवात केली, तसेच कार्डिओ, सक्तीचे डाएट या साऱ्या सवयी अंगी बाणवल्या. ‘जंकफूड’ला कायमचा रामराम करत आणि केवळ त्यांच्या जिद्दीच्या बळावर अभिषेक चौहान यांनी फक्त दोन महिन्यांत २५ किलो वजन कमी करण्याची किमया करुन दाखवली.