जे वयोवृद्ध लोक प्रतिदिन पाच तासांपेक्षा अधिक वेळ दूरदर्शन संचासमोर बसतात किंवा आठवडय़ातून तीन किंवा अधिक तास शारीरिक हालचाली कमी करतात त्यांना भविष्यात चालता न येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चेतावणी नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात देण्यात आली आहे.

वृद्ध व्यक्तींनी सतत टीव्ही पाहणे जोखमीचे ठरू शकते. यामुळे त्यांना अपंगत्वाचा सामना करावा लागू शकतो, असे अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या लोरेट्टा डायपेट्रो यांनी म्हटले आहे.

खूप वेळ बैठक मारून टीव्ही पाहणे (विशेषत: संध्याकाळी) वृद्ध व्यक्तींसाठी सर्वात धोकादायक गोष्टीपेकी एक असले पाहिजे. यामुळे वृद्धांच्या शरीराचे मोठे नुकसान होते, तसेच शरीर निष्क्रिय होते, असे त्यांनी म्हटले आहे.

संशोधकांनी या अभ्यासासाठी सहा राज्ये आणि दोन प्रमुख शहरांमधील ५० ते ७१ या दरम्यान वय असणाऱ्या पुरुष आणि महिलांचा अभ्यास केला. अभ्यासाच्या सुरुवातीला सर्व सहभागी निरोगी होते. वृद्ध लोक किती वेळ टीव्ही पहातात, व्यायाम, बागकाम, घरकाम तसेच इतर शारीरिक काम करतात यावर संशोधकांनी लक्ष ठेवले. या प्रकारे सहभागींवर १० वर्षे लक्ष ठेवण्यात आले.

अभ्यासाच्या अखेरीस सर्व निरोगी असणाऱ्या सहभागींमधील ३० टक्के वृद्धांना अपंगत्वाचा सामना करावा लागत होता. यामध्ये अनेक जणांना चालण्याची समस्या निर्माण झाली होती.

जे प्रतिदिन पाच किंवा अधिक तास टीव्ही पाहतात त्यांना चालण्याबाबतचे अपंगत्व येण्याचा धोका ६५ टक्क्यांनी वाढत असल्याचे संशोधकांना दिसून आले. तसेच अधिक वेळ टीव्हीसमोर बसल्यामुळे शारीरिक क्रियांचा वेग मंदावत असल्याचे आढळले.

सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत आपण प्रवास, लिफ्ट यादरम्यान इंटरनेट, मोबाइल फोन सतत वापरतो. प्रत्येक दिवसाला यामुळे बसण्याचे प्रमाण १४ तास झाले आहे. जर वृद्ध व्यक्तींना धडधाकट व्हायचे असेल तर त्यांनी प्रत्येक दिवशी योग्य प्रमाणात शारीरिक व्यायाम करणे तसेच एकाच ठिकाणी बसण्याचा वेळ कमी करणे आवश्यक असल्याचे, संशोधकांनी म्हटले आहे.