कर्करोगाचे आधीच्या अवस्थेत निदान करण्याची नवीन पद्धत विकसित करण्यात ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकांना यश आले असून त्यात मलेरियाच्या प्रथिनाचा वापर करून रक्तातील कर्करोग गाठींच्या पेशी ओळखता येतात.

युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स व युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगन यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे. रक्ताचे नमुने घेऊन त्यातील कर्करोग पेशी वेगळ्या काढण्याची बहुतांश अचूक पद्धत यात तयार करण्यात आळी आहे. सध्याच्या पद्धतींपेक्षा यात जास्त प्रमाणात कर्करोग पेशी पकडल्या जातात. त्यामुळे कर्करोग आधीच्या अवस्थेत कळण्यास मदत होते. यात मलेरियाचे व्हीएआर २ सीएसए हे प्रथिन कर्करोगाच्या पेशींना चिकटते. त्यामुळे या पद्धतीचा वापर कर्करोगाच्या निदानात आगामी काळात होऊ शकतो. नेचर कम्युनिकेशन्स या नियतकालिकात हे निष्कर्ष प्रसिद्ध झाले असून रक्ताचे नमुने घेऊन यात कुठल्याही प्रकारचा कर्करोग ओळखणे शक्य आहे असे ख्रिस हेशेने यांनी म्हटले आहे.

आधीच्या पद्धतीत कर्करोग पेशींच्या पृष्ठभागावरील विशिष्ट खुणांचा वापर करावा लागत होता. त्यातही सर्वच कर्करोग पेशींवर या खुणा असतात असे नाही. त्यामुळे यकृत, फु फ्फुसे व हाडात कर्करोग पसरत जातो तरी त्याचा पत्ता लागत नाही. नव्या पद्धतीत मलेरिया प्रथिनाच्या मदतीने कुठल्याही प्रकारचा कर्करोग शोधणे शक्य अशल्याने मानवात ९५ टक्के कर्करोगाचे निदान आधीच्या अवस्थेत करता येते. कर्करोगाच्या दहा पेशी पाच मिलीलीटर रक्तात सोडून यात प्रयोग करण्यात आले असता मलेरिया प्रथिनाचे आवरण असलेल्या चुंबकीय मण्यांनी लगेच कर्करोग पेशींना स्पर्श केला. यात दहा पैकी नऊ कर्करोग पेशी पकडण्यात यश आले.