आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर त्यात आहाराचा महत्त्वाचा वाटा असतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेच आपल्याला आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवतात. पण तसे होऊ नये म्हणून योग्य वेळी, योग्य तो आहार घेणे गरेजेचे असते. आता चांगला आहार म्हणजे सफरचंद, सुकामेवा किंवा आणखी काही महागडे पदार्थ असे आपल्याला अगदी सहज वाटून जाते. मात्र तुम्हाला आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर जास्ती पैसे खर्च करावे लागतात असे नाही. अगदी कमी खर्चातही तुम्ही खाण्यापिण्याचे तंत्र सहज सांभाळू शकता. पण त्यासाठी तुम्हाला योग्य गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच इतरही गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी.

चालणे

उत्तम आरोग्यासाठी चालणे हा अतिशय उत्तम व्यायाम आहे. आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास तुम्ही फिट आणि कार्यशील असणे आवश्यक असते. आता फिट राहायचे म्हटल्यावर अनेक जण जिम किंवा अॅरोबिक्स, पॉवर योगा यांसारखे क्लासेस लावतात. पण आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्याची गरज नसते. तर केवळ चालण्यानेही तुमचा चांगला व्यायाम होऊ शकतो. मात्र यामध्ये सातत्य असणे अतिशय आवश्यक असते.

भरपूर पाणी प्या

शरीरातील बहुतांश भाग हा पाण्याने व्यापलेला असतो. पाण्याचे शरीरातील स्थान माहित असूनही आपण कामाच्या नादात किंवा इतर गोष्टींमुळे पाणी पिणे विसरतो. पण शरीराचे सर्व कार्य सुरळीत चालू आहे हे पाहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. त्यामुळे आरोग्याचा समतोल राखण्यास चांगली मदत होते.

तुमचे अन्न घरीच बनवा

तुम्ही तुमच्यासाठी घरी अन्न बनवता तेव्हा तुम्ही केवळ पैसे वाचवत नाही तर तुम्ही आरोग्यदायी अन्न खाता. आपल्यातील अनेकांना नेहमी जंक फूड खायची सवय असते. एखादवेळी असे पदार्थ खाणे ठिक आहे पण कायम जंकफूड खाणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. त्यामुळे घरच्या घरी अन्नपदार्थ बनवा जे तुमच्या आरोग्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्याही परवडणारे असेल.

स्वयंपाकातील आवश्यक मसाले घरच्या घरी पिकवा

बागकाम करणे हा एक उत्तम छंद आहे. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स तर होताच तसेच तुम्हाला मन फ्रेश वाटायला लागते. कोथिंबिर, मिरची, आलं, ओवा, कडिपत्ता यांसारखे लहान पदार्थ तुम्ही घरच्या घरी पिकवू शकता. यासाठी तुमचे घर खूप मोठे असायला हवे असेही नाही. कुंड्यांमध्येही याची रोपे चांगल्या पद्धतीने तग धरु शकतात. त्यामुळे तुमचा बाहेरुन या गोष्टी आणण्याचा खर्चही वाचतो आणि आपल्या हाताने पिकवलेल्या गोष्टी खाल्ल्याचा आनंद वेगळाच असतो.