– डॉ. शौनक अजिंक्या

समाजापासून अचानक दूर राहण्याची सक्ती झाल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये भिती व चिंता व्यक्त होत आहे. लहान मुलांवरदेखील या अलगीकरणाचा मोठा परिणाम झालेला दिसतो. नोकरी, व्यवसाय करणाऱ्या पालकांना आता घरात मुलांसोबत वेळ घालवावा लागत आहे. यातदेखील अनेक आव्हाने आहेत. संपूर्ण देशभरात लॉकडाउन असल्याने, मुलांनी दिवसभर घरामध्येच राहावे, आपले ऐकावे, याकरीता पालक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. बऱ्याच मुलांच्या वार्षिक परीक्षा रद्द झाल्या आहेत आणि त्यांच्यावरील अभ्यासाचे ओझे आता काढून घेण्यात आले आहे. मात्र या परिस्थितीत मुलांना दिवसभर गुंतवून ठेवणे, हे घरातून ऑफिसचे काम करणाऱ्या पालकांसाठी सोपे नाही.

काही महत्त्वाच्या गोष्टी, सध्या आणि भविष्यातही, लक्षात घेण्याजोग्या ..

समाजमाध्यमांचा प्रभाव – मुलांना सांभाळण्याचा सध्याचा टाळेबंदीचा काळ हा 24 तास सुरू असणाऱ्या समाजमाध्यमांनी बऱ्यापैकी व्यापला आहे. ‘व्हॉट्सअप’वर विविध प्रकारच्या संदेशांचा अक्षरशः भडिमार सुरू असतो. मुलांना व्यस्त कसे ठेवावे, सध्याच्या सुटीच्या काळात त्यांचा मेंदू तल्लख कसा ठेवावा, याचे मार्गदर्शन करणाऱ्या ‘वेबसाईट्स’ व ‘अॅप्स’ची माहिती या संदेशांमधून देण्यात येते. या माहितीचा खरेच उपयोग होतो का? कदाचित होतो किंवा होतही नाही!

शिस्त – मुलांच्या दिवसभरातील खाण्यांच्या व जेवणाच्या वेळा, अभ्यासाचे वेळापत्रक, दैनंदिन व्यायाम, त्यांचे वागणे-बोलणे यांच्याबाबतीत कोणतीही तडजोड होता कामा नये. त्यांबद्दलची शिस्त मुलांना असायलाच हवी. इतर गोष्टी मात्र त्यांच्या मनासारख्या घडू द्याव्यात. मुलांवर कडक, जाचक बंधने लादू नयेत. शिस्तीत बसणारी एखादी गोष्ट एखाद्या दिवशी राहूनही जाईल, मात्र या गोष्टींचे वेळापत्रक मुलांना स्वतःलाच ठरवू द्या आणि त्या कशा करायच्या याचे नियोजनही त्यांनाच करू द्या. त्याबाबत त्यांचे स्वतःचे प्राधान्य असेल, तर असू द्यावे.

अनुकंपा – मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे व इच्छेप्रमाणे वेळ घालवू द्या. त्यांच्या आयुष्यात हा कदाचित पुन्हा कधीही न येणारा सुवर्णकाळ असू शकतो. दिवसभरात मुलांनी काय करावे, याबद्दल घातलेल्या सर्व नियमांबाबत सदासर्वकाळ फार कडक राहू नका.

मजेदार गोष्टी करा – एकत्र करता येतील अशा अनेक गोष्टी असतात, उदा. खाद्यपदार्थ बनवणे, व्हिडिओ गेम खेळणे किंवा घरात खेळता येतील असे खेळ खेळणे. मुले अगदी लहान असतील, तर त्यांना गोष्टी मोठ्याने वाचून दाखवणे हाही त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा चांगला मार्ग आहे.

सामाजिक जबाबदारी – मुलांना सामाजिक जबाबदारीचे भान आणून द्या. सध्या घरात राहणे हे घरातल्या माणसांसाठीच नव्हे, तर देशातील सर्व नागरिकांच्या आरोग्यासाठी कसे चांगले आहे, हे त्यांना समजावून सांगा.

तुलना करू नका – आपण स्वतःकडून फार अपेक्षा बाळगत असतो. याबाबत थोडा स्वतःला आवर घाला. आपली किंवा मुलांची तुलना दुसऱ्यांबरोबर सतत करू नका. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण पालक होऊ शकत नसते.

सारखे सल्ले देणे टाळा – जे सल्ले तुम्हाला आवडत नाहीत किंवा त्या सल्ल्यांनुसार वागणे तुम्हाला जमत नाही, ते सल्ले इतरांनाही देऊ नका. तुम्हाला जे योग्य वाटते, तेच करा.

मुलांनी तुम्हाला मार्गदर्शन करावे यासाठी त्यांना परवानगी द्या – मुलांना त्यांच्या पद्धतीने आनंद उपभोगू द्या. आनंदी राहण्यासाठी त्यांना काय हवे, ते विचारा. तुम्ही एखादा निर्णय घेताना मुलांना त्याबद्दल काय वाटते, हे त्यांच्याकडून जाणून घ्या. त्यांच्या मतांची किंमत तुम्हाला वाटते, हे त्यांना दाखवून द्या. मुलांना आनंदी, खुष असलेले पाहणे ही जगातील सर्वात चांगली भावना आहे.

स्वतःची काळजी सर्वप्रथम घ्या – तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकत नसाल, तर दुसऱ्यांचीही काळजी घेऊ शकणार नाही. हे तत्व अगदी आताही खरे आहे आणि भविष्यातही. तुमच्या भावना, तुमचे मन हे सतत आनंदी व उत्साही राहील असे पाहा; जेणेकरून मुलांना जेव्हा तुमची गरज लागेल, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध राहू शकाल. नेहमी व्यस्त व चिंताग्रस्त राहणे टाळून तुम्ही स्वतःसाठी वेळ देता, ही तुमची सवय मुलांपुढे उदाहरण म्हणून मांडता यावयास हवी. पालक जे सांगतात त्यानुसारच मुले वागतात असे नव्हे, तर पालक जसे वागतात, त्याचेही अनुकरण मुले करीत असतात. आनंदी निरोगी पालकांमुळे मुलेही आनंदी, निरोगी होतात.

नव्या पिढीचे स्वागत करा – दोन हजार या वर्षानंतर जन्मलेली मुले ही सध्या ‘जनरेशन झेड’ या नावाने ओळखली जातात. या ‘जनरेशन झेड’ला सध्याच्या काळात घरात बसून आभासी जगाचा अनुभव घ्यायला तशी अडचण नसावी. अगोदरच्या पिढीला तशी अडचण काही प्रमाणात येत असे. या पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा ही ‘जनरेशन झेड’ बरीच वेगळी आहे. ती अधिक जागतिक स्वरुपाची व विविधांगी आहे. या ‘जनरेशन झेड’ला गुंतून राहण्यासाठी व जोडलेले राहण्यासाठी अनेक ‘प्लॅटफॉर्म’ व ‘चॅनेल्स’ उपलब्ध आहेत. कोणत्याही नव्या पिढीला नाविन्याची आवड असतेच, तथापि सध्याच्या नव्या पिढीचा नाविन्याकडे जाण्याचा वेग व त्याची पुनरावृत्ती पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आहे. तंत्रज्ञान व त्याची कनेक्शन्स जितक्या वेगाने बदलत जातील, तितक्या वेगाने नव्या पिढ्या बदलतील.

( लेखक कन्सल्टंट सायकिअॅट्रिस्ट, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल आहेत )