उन्हाळय़ाच्या दिवसात फळांचा थंडगार रस, सरबत किंवा मिल्कशेक प्यायला सर्वानाच आवडते. फळांचा रस तयार करण्यासाठी ज्यूसरचा वापर केला जातो. त्यामुळे ज्यूसरची नियमित काळजी घेणे आवश्यक आहे.

  • ज्यूसरचा वापर करण्यापूर्वी आणि वापर केल्यानंतर त्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे. अनेकदा ज्यूसरमध्ये फळांचा उरलेला चोथा राहतो. तो साफ न केल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते. फळांचा हा चोथा कुजतो आणि नंतर जर त्या ज्यूसरमधून रस बनवला तर तो आरोग्यासाठी चांगला नसतो.
  • ज्यूसर वेळोवेळी साफ केल्यास त्याचे आयुर्मानही वाढते. फळांचा उरलेला चोथा राहिल्याने ज्यूसरची आतमधील यंत्रणा खराब होऊ शकते. हा चोथा एखाद्या खरखरीत सँडपेपरसारखे काम करतो. त्यामुळे ज्यूसरचे ब्लेड नादुरुस्त होतात.
  • फळांचे उरलेले तंतूमय पदार्थ ज्यूसरमधील सूक्ष्म छिद्रांमध्ये अडकून राहतात. त्यामुळे ज्यूसरची काम करण्याची क्षमता कालांतराने कमी होते. त्यामुळे ज्यूसरची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे.
  • ज्यूसर साफ करताना गरम पाणी किंवा प्रभावी डिर्टजटचा वापर करू नका. त्यामुळे ज्यूसरचे रबर पॅड खराब होऊ शकतात.
  • ज्यूसर साफ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करू शकता. या पाण्यात डिशवॉशिंग लिक्विड टाकू शकता. ज्यूसरबरोबर साफ करण्यासाठी ब्रश दिलेला असतो. या ब्रशचाच वापर करून ज्यूसर साफ करू शकता.
  • ज्यूसर साफ करण्यापूर्वी त्याचा वीजप्रवाह खंडित करावा. प्लग काढूनच ज्यूसर साफ करा.
  • साफ केल्यानंतर ज्यूसर स्वच्छ कापडाने पुसून घ्या.