आधार कार्ड हे सध्या जवळपास सर्वच महत्त्वाच्या व्यवहारांसाठी सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर आधारकार्ड पॅन कार्ड, बँक खात्याशी संलग्न करावे लागणार आहे. आधारकार्ड नसल्यास सरकारी योजनांचा फायदा घेता येणार नाही, असेही सरकारने सांगितले आहे. सध्या हॅकिंगच्या बाबतीत वेगवेगळ्या बातम्या येत असताना तुमचे आधारकार्डही चुकीच्या पद्धतीने वापरले जाण्याची शक्यता आहे. सुरक्षा तज्ज्ञांनीही बऱ्याच जणांचे आधारकार्ड लिक होत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तुम्हाला तुमची आधारची माहीती सुरक्षित ठेवायची असल्यास काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

आधारकार्डची सुरक्षितता तुम्ही ऑनलाइनही तपासू शकता. यामध्ये मागच्या सहा महिन्यात तुमचे आधारकार्ड कोणत्या ठिकाणी वापरण्यात आले हे तपासता येते. यामध्ये तुमचे आधारकार्ड वापरुन कोणता चुकीचा व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यास तुमच्याकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे असे UIDAI ने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे. या फिचरमुळे तुम्हाला प्रमाणीकरण करण्यात आलेल्या गोष्टीही पाहता येणार आहेत. पाहूयात आधारचा इतिहास तपासण्याच्या पायऱ्या

१. https://uidai.gov.in या वेबसाइटवर क्लिक करा. यामध्ये आधार सर्व्हीसेस यावर क्लिक करुन आधार ऑथेंटीकेशन हिस्टरीवर क्लिक करा.

२. त्यानंतर याठिकाणी असलेल्या एका रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा १२ आकडी आधार क्रमांक टाका.

३. त्यानंतर एक सिक्युरीटी कोड टाका आणि जनरेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.

४. यानंतर येणाऱ्या पेजवर ऑथेंटीकेशन टाइप, डेट रेंज, रेकॉर्डचे नंबर आणि ओटीपी अशी माहिती भरावी लागेल.

५. ऑथेंटीकेशन टाइपमध्ये अनेक पर्याय विचारले जातील. त्यातील ऑल हा पर्याय निवडा.

६. तारखेमध्ये तुम्ही मागील सहा महिन्यांतील तारीख शोधू शकता. तर रेकॉर्डसमध्ये तुम्ही मागचे ५० रेकॉर्ड तपासू शकता.

७. यानंतर ओटीपी टाकून सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला हवे असलेले सगळे रेकॉर्ड दिसू शकेल.

८. यामध्ये तुम्हाला तुमच्या आधारकार्डबरोबर कोणता चुकीचा व्यवहार झाल्याचे आढळल्यास तुम्ही UIDAI च्या १९४७ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करुन तक्रार नोंदवू शकता.