डॉ.अमोल देशमुख

राग ही एक नकारात्मक अस भावनिक स्थिती आहे, जी व्यक्तीच्या कठोर अपेक्षा, भेदभाव, बदला घेण्याच्या विचारांमधून निर्माण झालेली असते. रागामुळे नेहमीच आक्रमकता  येते  असे नाही, पण आक्रमकतेमागे नेहमीच राग असतो. रागामुळे स्वास्थ्य बिघडून नातेसंबंधही बिघडतात, एखाद्याला शारीरिक दुखापत होते, अतिरागात गुन्हे घडतात असे अनेक प्रतिकूल परिणाम होऊ  शकतात. सातत्याने तीव्रतेने राहणारा राग बऱ्याचशा मानसिक, शारीरिक व्याधींना (उदा. नैराश्य, बेचैनी, व्यसनाधीनता, उच्च रक्तदाब) जन्माला घालतो.

याउलट निरोगी किंवा स राग व्यक्तीला ध्येयापर्यंत घेऊन जाण्याची ऊर्जा प्रदान करतो.  अस्वास्थ्य किंवा अस रागामुळे व्यक्ती त्याच्या ध्येयांपासून दूर जाऊन नकारात्मक परिणाम होतात.

रागाचे, दोन्ही भावनिक आणि आचरणात्मक परिणाम विचित्र आहेत. रागाचे नियंत्रण न करता बरेचजण राग मनात ठेवतात तर काही आक्रमक वर्तनामुळे मित्र, कुटुंब आणि सहकर्मीशी असलेल्या आपल्या संबंधांवर परिणाम होतात. इतर सर्व भावनिक अवस्थांप्रमाणेच राग हा असे संकेत देतो की वातावरणात काहीतरी अडथळा बनला आहे आणि त्यास बदलण्याची आवश्यकता आहे.

रागाच्या भावनेचे पृथक्करण करताना, व्यक्तीने स्वत:विषयी, इतरांविषयी कठोर नियमावली बनवलेली असते. नियम बनवणारे मोडणारे दोन्ही माणसेच असतात. मात्र राग या भावनेमध्ये मी जेव्हा स्वत:चे कोर्ट चालवून, स्वत:ला जज समजतो, तेव्हा नियम मोडणारा गुन्हेगार  आपणच  ठरवतो आणि गुन्ह्यची शिक्षा रागाच्या माध्यमातून दिली जाते.

रागाची उत्पत्ती तेव्हा होते, जेव्हा आपला विश्वास असतो की दुसरी व्यक्ती निरुपयोगी आहे किंवा एखाद्याने नियम उल्लंघन करून अन्यायकारक वागणूक दिली आहे आणि ती व्यक्ती नैतिकदृष्टय़ा चुकीची व्यक्ती आहे किंवा एखाद्याने संपूर्णपणे राग व्यक्त केला पाहिजे, नाहीतर तो त्रासदायक ठरेल असे वाटणे किंवा इतरांना नियंत्रित करण्याचा मार्ग म्हणून राग व्यक्त करणे.

रागाचे व्यवस्थापन करताना स्वत:ला आलेल्या रागाचा स्वीकार करून त्या भावनेची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. बाह्यघटक राग येण्यासाठी काही अंशी कारणीभूत असले तरी स्वत:चे विचार आणि असलेला अविवेकी दृष्टिकोन रागाला भडकविण्यास कारणीभूत असतो.

रागाच्या टप्प्यावरून चिडचिडीच्या टप्प्यावर येणे हे पहिले उद्दिष्ट आहे, हे करत असताना नातेसंबंधांमध्ये केवळ माझाच दृष्टिकोन योग्य आहे हा दुराग्रह सोडून दिला तरच तुम्ही  समोरच्याच्या भूमिकेतून विचार करण्यासाठी सज्ज होता. आपण जेव्हा ‘च’ची भाषा वापरून अविवेकी आणि बालिश हट्ट करतो, तेव्हा त्यावेळी रागासारख्या अहितकारक भावनेचा जन्म होऊन स्वत:चे आणि नात्याचे नुकसान करून घेतो.

जी गोष्ट आपण बदलू शकत नाही, ती बदलण्याचा खटाटोप करण्यापेक्षा किंवा आपण ती का बदलू शकत नाही यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा परिस्थितीतून मार्ग काढण्याचा पर्याय निवडणे योग्य  ठरते. एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा एखादा गुण पटला नाही म्हणून ती संपूर्ण व्यक्ती टाकाऊ  ठरत नाही, एखादी गोष्ट किंवा व्यक्ती मला हवी तशीच असली पाहिजे  या प्रकारच्या दुराग्रही मागण्या आपण ठेवल्या तर आपण स्वत:चे नुकसान करून घेतो. रागाच्या भरात इतरांवर शिक्कामोर्तब न करता  इतरांचा ‘विनाशर्त स्वीकार ’(अटी न घालून) करणे राग व्यवस्थापनासाठी  गरजेचे असते.