रोजच्या धकाधकीतून वेळ काढून अधून-मधून फिरायला जाणे कोणाला आवडत नाही? चांगला घालवलेला सुट्टीचा काळ एक बदल म्हणून फार उपयोगी पडतो. उन्हाळ्याच्या सुट्या तर फिरायला जाण्यासाठी पर्वणीच असतात. अशावेळी छान ट्रीप करुनही तुमची चांगली बचत झाली तर? प्रवासखर्चात बचत करणे म्हणजे गैरसोय सहन करणे नव्हे. तर पाहूयात प्रवासाचा खर्च कमी करण्याच्या काही खास टिप्स…

विमान तिकिटे: तीन ते सहा महिने आधी बुकिंग केल्यास विमान तिकिटांवर चांगली बचत होते. याशिवाय इतर मार्गसुद्धा आहेत. आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्ये प्रवास करावा, कारण शनिवार-रविवारच्या विमानाची तिकिटे महाग असतात. एकाच एयरलाइनने प्रवास करण्याऐवजी दोन किंवा तीन एयरलाइन पाहा. अशाने प्रवास अधिक वेळ करावा लागू शकतो. प्रवास-वेब साइट्सवर नोंदणी करून घ्या आणि तिकिटांच्या किंमती कमी झाल्यावर सूचना मिळवा. तिकिटे रद्द करण्यास शुल्क आकारले जाणार नसल्यास तुम्ही आधी बुक केलेली तिकिटे रद्द करून कमी दरात नवीन बुकिंग करू शकता.

हंगाम नसताना प्रवास करा: बहुतांश प्रवासी एखाद्या ठिकाणी जातात त्याच्या काही काळ आधी किंवा नंतर प्रवास करा. अशाने तिथे गेल्यावर तुम्हाला शांती तर लाभतेच, प्रवासखर्च आणि हॉटेलचा खर्चसुद्धा कमी होण्याची शक्यता असते. फक्त ते ठिकाण प्रवाशांसाठी उघडे आहे याची खात्री करून घ्या.

मोठ्या हॉटेल्सकडे पाठ फिरवा: महागड्या प्रस्थापित हॉटेलमध्ये राहाण्यापेक्षा एखादे कौटुंबिक ठिकाण शोधा. अशा ठिकाणी मुक्काम स्वस्त तर असतोच, त्यासोबतच स्थानिक संस्कृती आणि खाणे यासाठी सुद्धा ते बरे पडते. जर तुम्ही अनेक लोकांसोबत बरेच दिवस प्रवास करणार आहात, तर भाड्याचे घरसुद्धा बघू शकता. अशा ठिकाणी स्वयंपाकघर सुद्धा जय्यत तयार असते जिथे तुम्ही स्वयंपाक करू शकता. पण तुम्ही थोड्या-थोड्या काळासाठी अनेक ठिकाणी जाणार असाल, तर तुम्ही तासाप्रमाणे दर असलेली ठिकाणे पाहू शकता.

डील्स आणि डिस्काउंटकडे लक्ष ठेवा: तुम्हाला मोठ्या हॉटेलमध्ये राहायचे असल्यास हरकत नाही. त्यातही निरनिराळ्या वेबसाइट्सवर चांगल्या डील्स आणि डिस्काउंट शोधून तुम्ही बचत करू शकता. सोशल मीडियावरील प्रतिस्पर्धा जिंकून तुम्ही असे डिस्काउंट किंवा मोफत कूपन मिळवू शकता. हॉटेल नक्की करण्याआधी विविध वेबसाइट्सवरील किमती पाहून घ्या.

विनामूल्य होणारी कामे शोधा: प्रेक्षणीय स्थळे पाहाण्यासाठी एखादी कार भाड्याने घेऊन त्यात फिरण्याऐवजी सार्वजनिक प्रवासाची साधने किंवा पायी चालण्याची विनामूल्य सहल पाहा. अशाने तुम्ही एखाद्या शहराची फक्त प्रमुख स्थळे पाहाण्याऐवजी इतर बरेच काही पाहू शकाल. थोडा शोध घेतल्यास तुम्हाला विनामूल्य करता येणारी अनेक ठिकाणे मिळू शकतील.

 

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार