सणासुदीच्या हंगामात अनेक वेळा आपल्याला अचानकपणे प्रवास करावा लागतो. फ्लाइट बुकिंग असो किंवा हॉटेलचे रिझर्वेशन, अशा गोष्टी काही काळ अगोदरच केलेल्या बऱ्या. तरीही, नेहेमीच असे होत नाही की आपण प्रवासाचे नियोजन आधीपासून करू शकतो, किंवा आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ असते. अचानकपणे समोर आलेला नातेवाईकांचा एखादा कार्यक्रम किंवा अनपेक्षित सहल अशा गोष्टी तुम्हाला प्रवास करायला लावू शकतात. आणि यामुळे जर तुमच्याकडे पैशाची अडचण असली तर ते एक आव्हानच असते. पाहूया अशावेळी कमी त्रास करून वेळ कशी निभावून नेता येईल…

सणाच्या दिवशी प्रवास करा

बहुतांश लोक सणाच्या एक दिवस आधी किंवा आधीच्या शनिवार-रविवारी घरी किंवा त्यांना जायचे असेल त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अशा दिवसांमध्ये विमानाचे तिकीट गर्दीमुळे बरेच महाग असते. अशात तुम्ही सणाच्या दिवशी प्रवास करून स्वस्त दरात तिकीट घ्यायचा प्रयत्न करू शकता. तसेच मोठ्या शहरांत जाताना सोमवारी सकाळी आणि तिथून निघताना शुक्रवारी संध्याकाळी प्रवास करणे टाळा कारण अशावेळी व्यावसायिक प्रवासी अधिक असल्यामुळे तिकीटे महाग असतात. प्रवासी वेबसाईट्सवर तिकीटांचा दर कमी झाल्यावर सूचना पाठवण्याची सोय असते तिचा वापर करा ज्याने तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळेल.

फ्लाईट मॅप वापरा

फ्लाईट मॅपच्या अॅप वापरून तुम्हाला जायचे असेल त्या ठिकाणाच्या विविध फ्लाईटच्या दरांची तुलना करा. अनेकदा त्या ठिकाणहून काही तास लांब असलेल्या ठिकाणची फ्लाईट घेणे बरेच स्वस्त असू शकते, त्यानंतर तुम्ही टॅक्सी करू शकता. जर तुम्हाला जायचे ठिकाण अजून नक्की झालेले नसले, तर तुमच्या मनात असलेल्या ठिकाणाचे प्रकार, जसे “समुद्र किनारा”, वापरून त्यातल्या त्यात सर्वात स्वस्त ठिकाण निवडू शकता.

क्रेडिट कार्ड वापरा

फ्लाईटचे तिकीट, हॉटेल्स आणि इतर खरेदी साठी क्रेडिट कार्ड वापरून डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळवा. अशाने तुम्ही आज खरेदी करून काही कालावधीने पैसे भरू तर शकताच, क्रेडिट कार्डांमुळे तुम्हाला कमाल ५५ दिवसांचा व्याज-मुक्त कालावधी मिळतो. या वेळात तुम्ही पैशांची व्यवस्था करू शकता. जर कार्डाच्या तारखेवर तुम्ही पैसे भरण्यास असमर्थ असलात, तर तुम्ही हे देणे पुढील महिन्यावर ढकलू शकता. अशात व्याज तेवढ्याच रकमेवर आकारले जाईल जी तुमची भरायची शिल्लक असेल. तुम्ही हे देणे हप्त्यांने भरू शकता.

वैयक्तिक कर्ज घ्या

एवढे करून सुद्धा पैसे कमी पडत आहेत? तुमच्या दीर्घकालीन गुंतवणुकींना हात लावू नका. त्याऐवजी वैयक्तिक कर्ज घ्या, हे घ्यायला सोपे असून यासाठी काही तारण ठेवावे लागत नाही. त्यामुळे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी तुमचे घर किंवा इतर मौल्यवान वस्तू तारण ठेवाव्या लागत नाहीत. तुम्ही कर्जाची रक्कम प्री-पेड कार्ड, डेबिट कार्ड, प्रवासी चेक यांच्यात वाटून घेऊ शकता. या कर्जांवर व्याजाचा दर वार्षिक ११ ते २० टक्के इतका असतो.

प्रवास कंपनीकडून अर्थसहाय्य घ्या

काही प्रवास कंपनी तुम्हाला आज प्रवास केल्यावर काही काळाने पैसे भरण्याची सवलत देतात. अशा कंपनी काही एनबीएफसी आणि वित्तीय संस्थांकडून पैशाची व्यवस्था करून देतात. अशा योजनांमध्ये कमाल ५ लाख रुपये एवढी रक्कम मिळू शकते आणि यात तिकीट, प्रेक्षणीय स्थळे पाहाणे, हॉटेलमध्ये राहाणे इत्यादी सामील असते. परतफेड एक ते पाच वर्षात केली जाऊ शकते. यावरील व्याजाचा दर वैयक्तिक कर्जाप्रमाणेच ११ ते २० टक्के वार्षिक असू शकतो.

आदिल शेट्टी

सीईओ बँकबझार