रंगपंचमीत मोठ्या प्रमाणात रंग खेळले जातात. या काळात बाजारात अनेक रासायनिक रंगही येतात. या रंगामुळे त्वचेला मोठ्या प्रमाणात इजा पोहोचते त्यामुळे हल्लीच्या काळात रासायनिक रंगांना पर्याय म्हणून नैसर्गिक रंगही बाजारात आले आहेत. हे रंग पूर्णपणे सुरक्षित असतात तसेच त्वचेलाही यामुळे इजा पोहोचत नाही. मात्र हल्ली नैसर्गिक रंगाच्या नावाखाली बनावट रंगही विकले जात आहेत. तेव्हा नैसर्गिक रंगाच्या नावानं विकले जाणारे बनावट रंग कसे ओळखावे हे आपण जाणून घेऊ.

नैसर्गिक रंग बनवण्यासाठी कात, पालक, झेंडूची फूले, बीट, हळकुंड, नीळ, टेसूची फुले इत्यादींचा वापर केला जातो. हे पदार्थ उकळून ते सुकवले जातात आणि मग त्यापासून रंग तयार केले जातात. या रंगांचा वापर केल्याने शरीराला तसेच निसर्गालाही हानी पोहोचत नाही. परंतू बाजारातील रायनिक रंग हे फार कमी किंमतीत उपलब्ध असल्याने लोक त्यांचा वापर करतात किंवा अनेकदा नैसर्गिक रंगाच्या नावानं रासायनिक रंगही विकले जातात.

नैसर्गिक रंग कसे ओळखावेत?
नैसर्गिक रंग नेहमी बंद पाकिटांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. तसेच त्या पाकिटांवर प्रयोगशाळेत चाचणी केल्याचा क्रमांक आणि हे रंग कशापासून तयार केले आहेत हे छापील स्वरुपात असते. हे रंग विक्रीसाठी येताना ते पाकिटबंद असतात. तसेच या रंगाना एक विशिष्ट फुलांचा सुगंधही असतो.  त्यामुळे हे रंग विकत घेताना पाकिटावर छापण्यात आलेली माहिती वाचूनच मग ते विकत घ्यावे.