बँक आणि वित्तीय संस्था ग्राहकाला सर्वोत्तम व्याजदराने कर्जे देताना ग्राहकामध्ये क्रेडिट स्कोअरचा शोध घेतात. मालमत्ता, कार खरेदी किंवा इतर कोणतीही मोठी खरेदी करताना किंवा आणीबाणीच्या प्रसंगांचा सामना करताना चांगला क्रेडिट स्कोअर उपयोगी येतो. मुख्य म्हणजे हा स्कोअर म्हणजे कर्जदाराची पत सांगणारा प्रमुख दुवा असतो.

तुमचा क्रेडिट स्कोअर क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून मोजला जातो. या एजन्सीज्‌ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत काम करतात. हा स्कोअर म्हणजे तुमच्या कर्जासाठीच्या पात्रतेची पावती असते. आता हप्ते भरण्यास उशिर झाला असल्यास किंवा दीर्घकाळपर्यंत थकबाकी राहिल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. पण यासाठी घाबरू नका तर तुम्ही हा स्कोअर वाढविण्यासाठी काय करू शकता याचा विचार करा. पाहूयात त्याचेच काही उपाय…

तुमच्या क्रेडिट हिस्टरीकडे लक्ष द्या  

सुरुवातीला तुम्ही तुमच्या क्रेडिट हिस्टरीचा संपूर्णपणे आढावा घेणे महत्त्वाचे असते. तुमचा स्कोअर कमी होण्याची कारणे शोधून काढा. बऱ्याचदा कर्जाचा भरणा करण्यात झालेल्या विलंबामुळे हे घडत असते. तुम्हाला कर्ज देणाऱ्या संस्थेने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळेही हे घडू शकते. अशाप्रकारे चुकीची माहिती दिली असेल, तर तुम्ही क्रेडिट ब्युरोशी संपर्क साधून त्यात दुरुस्ती करून घ्या. कारण तुम्हाला कर्ज देणाऱ्या संस्थेने शेअर केलेल्या डेटाच्या आधारेच तुमचा रिपोर्ट पडताळून पाहिला जातो. जर शेअर केलेला डेटा कोणत्याही कारणामुळे चुकीचा असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या स्कोअरवर होतो.

लोन म्हणून घेतलेली रक्कम वेळेवर भरा

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी तुम्ही घेतलेले कर्ज आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर आणि पूर्णपणे भरणे महत्त्वाचे आहे. क्रेडिट कार्डचे बिल थकलेले असल्यास खूप मोठ्या दराने दंडासहित व्याज भरावे लागेलच, शिवाय तुमचा क्रेडिट स्कोअरही कमी होईल.

तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी ठेवा

तुम्ही जरी तुमची देयके वेळेवर भरीत असलात आणि तरीही तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो उच्च असेल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर वाईट दिसू शकतो. क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे सर्व क्रेडिट कार्ड्‌स मिळून जी उधारीची मर्यादा (क्रेडिट लिमिट) असते, त्याच्या तुलनेत येणे बाकी असलेली उधारीची रक्कम (क्रेडिट बॅलन्स). यामध्ये तुम्ही एकतर तुमच्या क्रेडिट कार्ड प्रोव्हायडरला तुमचे क्रेडिट लिमिट वाढवायला सांगू शकता किंवा तुमचे खर्च वेगवेगळ्या कार्डामध्ये विभागून करु शकता.

कर्जासाठी आणि क्रेडिट प्रॉडक्टसाठी वारंवार अर्ज करू नका

तुम्ही जर कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्ड अकाऊंटसाठी वारंवार अर्ज करीत असलात, तर कर्ज देणारी संस्था तुमचा क्रेडिट स्कोअर तपासून पाहते. खूप वेळा तपासून पाहिल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर ऑनलाईन मोफत तपासून पाहता येऊ शकतो.

कर्ज घेणे संपूर्णपणे टाळू नका

तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की, मुळातच कर्ज घेणे टाळल्याने तुम्ही मजबूत स्वतंत्र बनाल. तर असे केल्याने तुमच्याकडे क्रेडिट हिस्टरी तयारच होणार नाही. त्यामुळे कर्ज घ्यायला घाबरू नका. तुम्ही क्रेडिट कार्डने सुरुवात करू शकता आणि त्याच्या साह्याने छोटे छोटे व्यवहार करू शकता. वेळीच परतफेड करून क्रेडिट कार्डचा नियमित, शिस्तबद्ध वापर केल्याने खरे म्हणजे तुम्हाला खूप चांगला क्रेडिट स्कोअर प्राप्त होऊ शकतो.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार