14 December 2017

News Flash

‘अशी’ वाढवा तुमची कल्पनाशक्ती

काही सोप्या टिप्स

अवधूत नवले | Updated: August 9, 2017 11:00 AM

प्रातिनिधिक छायाचित्र

सध्याचा जमाना आहे ‘इनोव्हेशन’चा.. जागतिक पातळीवर इनोव्हेशनला मोठे महत्व आहे. आज जगात होणाऱ्या अर्थिक उलाढालींपैकी सर्वाधिक उलाढाली या केवळ इनोव्हेशन वर आहेत. हे इनोव्हेशन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्यातील कल्पकताच आहे. प्रत्येक माणसाकडे असणाऱ्या या क्लपकतेच्या जोरावर आपण आजपर्यंतची प्रगती केली आहे. ही कल्पकता माणत येते कुठून याबाबत जगभरात बराच अभ्यास झाला आहे. पण तरीही त्याचे गुढ अजून उकलले नाही. ढोबळमानाने कल्पकता आणि माणसाची बुद्धी यांच्या नात्याबाबत काही शास्त्रज्ञांनी आपले मत मांडले आहे.

माणसाची बुद्धी ही त्याच्या कल्पकतेचा मूळ स्रोत आहे. कारण माणसाला जगताना येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधणे, त्याचे निवारण करणे हे बुद्धीचे प्रमुख काम आहे त्यामुळे तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा मनुष्यासमोर समस्या आल्या तेव्हाच वेगवेगळ्या कल्पनांच्या साह्याने मनुष्याने अनेक शोध लावले आहेत. ‘चाकाचा शोध’ हा एका ठिकाणा वरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या समस्येवर शोधलेली एक कल्पना होती, तसेच अग्नीचा शोध हा थंडीपासून बचाव या समस्येवरील उपाय होता आणि यासाठी दोन दगडांचा वापर ही मनुष्याला त्यावेळी सुचलेली एक कल्पना होती, तेव्हा कल्पना ही अशी खूप काही मोठी, जगावेगळी,अवघड संकल्पना नसून तुमच्या माझ्यासारख्याला सुचणारीच गोष्ट आहे. ‘कल्पकता’ ही बुद्धीला दिलेली एक चालना असते. हीच कल्पकता आपल्याला काही गोष्टींचा अवलंब करुन विकसितही करत येते. पाहूयात काय आहेत या गोष्टी…

१. गोष्टी वाचताना किंवा ऐकताना कल्पकता वापरा: आपण लहानपणापासून प्राण्यांच्या-पक्ष्यांच्या गोष्टी वाचत आलेलो आहोत आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा सांगत आलेले आहोत, या गोष्टींचे मूल्य समजून घेण्याआधी त्यातील प्राण्यांनी-पक्ष्यांची वापरलेली कल्पकता समजून घ्या आणि समजून सांगा. जसे की कावळ्याने पाण्यावरती येण्यासाठी वापरलेले दगड, आजच्या जमान्यात वापरलेला स्ट्रॉ, धुर्त कोल्ह्याने स्वतःच्या बचावासाठी सिंहाला विहिरीत दाखवलेले स्वतःचेच प्रतिबिंब,उंदराने सिंहाला सोडवण्यासाठी स्वतःच्या दातांचा केलेला कल्पक वापर या साऱ्यावरून तुम्हाला कल्पनांचा हेतू समजू शकतो. अशा अनेक गोष्टी तुम्ही स्वतः तयार करू शकता आणि त्या तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, लहान मुलांना सांगू शकता.

२. रोजच्या जगण्यातील ‘जुगाड’ : आपल्या रोजच्या दिनचर्येत असे अनेक प्रसंग येतील ज्यात तुम्ही एखाद्या समस्येला तोंड देत असाल. जसे की मोबाईलचा चार्जर विसरणे, घरातील घड्याळाचे सेल सारखे संपणे किंवा खराब होणे, घरातील ओला कचऱ्याला कुबट वास येणे अशा अनेक गोष्टी तुमच्या समोर आ वासून उभ्या असतात. अशावेळी तुम्ही काही कल्पनांचा वापर करून त्यावर उपाय शोधू शकता. अशा रोजच्या समस्यांवरून,कल्पनांमधूनच माणूस अधिक कल्पक होऊ शकतो.

३. रोज एक तरी खेळ खेळा : खेळण्याने तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि त्यामुळे विविध प्रकारचे विचार करण्याची सवय बुद्धीला लागते, जसे की पत्ते खेळताना, बुद्धिबळ,कॅरम, क्रिकेट, फ़ुटबॉलसारख्या असंख्य खेळांमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ‘कल्पकता’ दिसेल. तुम्ही स्वतः तसेच तुमच्या आजुबाजूच्या लोकांसोबत तुम्हाला जमेल तसे खेळ खेळायला पाहिजे.

४. स्मरणशक्ती वाढवा : तुम्ही तुमची स्मरण शक्ती जितकी वाढवाल तितकी तुमची बुद्धी कल्पक बनेल, कारण एकदा का तुमच्या बुद्धीने एखादी गोष्ट स्मरणात ठेवली की तुम्ही ती हव्या त्या वेळी हव्या त्या पद्धतीत वापरू शकता आणि कल्पक बनू शकता. यासाठी लोकांचे मोबाईल क्रमांक पाठ करा, तुम्ही लोकांना त्यांच्या पुर्ण नावाने लक्षात ठेवा, लोकांचे पत्ते,ई-मेल आयडी स्मरणात ठेवता आले तर उत्तमच.

अशा प्रकारे ‘कल्पकता’ ही खूप साध्या साध्या गोष्टींमधून तुम्हाला सापडेल आणि तुम्हाला अधिक उत्साहित करेल. तेव्हा ही कल्पकता वापरुन आयुष्य कल्पक बनवूया.

अवधूत नवले

First Published on August 9, 2017 11:00 am

Web Title: how to increase your creativity some easy tips