चेहरा हा प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. सर्वांसमोर आपण चांगले दिसावे असे सगळ्यांनाच वाटत असते. मग यासाठी कधी सौंदर्यप्रसाधनांचा वापर तर कधी पार्लरची वाट धरली जाते. पण हे उपाय तेवढ्यापुरते उपायकारक असतात. मात्र चेहरा दिर्घकाळासाठी चांगला व्हावा असे वाटत असेल तर घरच्या घरी आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या पदार्थांपासून फेसपॅक तयार करता येतात. यामध्ये रसायने नसल्याने चेहऱ्याच्या त्वचेला कोणतीही इजा होण्याची शक्यता नसते. तसेच या पॅकमधून त्वचेला जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंटस मिळतात. पाहूयात असेच काही सहज करता येतील असे सोपे फेसपॅक

१. ओटमिल आणि पाणी यांचा स्क्रबर

ओटस हे हल्ली बाजारात सहज उपलब्ध होणारे आहे. अनेक जण ओटसचा शेकही पौष्टीक पदार्थ म्हणून घेतात. हे ओट्स आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही उपयुक्त ठरु शकतात. ओटमिलमध्ये व्हीटॅमिन आणि अँटीऑक्सिडंटस असतात. त्याचा त्वचेला चांगला उपयोग होतो. तसेच पाण्यामुळे त्वचेतील अनावश्यक टॉक्सिन्सचा नाश होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर साचलेली धूळ आणि इतर कण स्वच्छ होतात. पाणी आणि ओट्समिल यांचे मिश्रण करुन ते १५ मिनिटांसाठी चेहऱ्याला लावून ठेवावे. मग साध्या पाण्याने चेहरा धुवावा.

२. मृत त्वचा निघून जाण्यासाठी उपयु्त दूध

दूध हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. त्याचप्रमाणे त्वचेसाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. दुधात असणाऱ्या लॅक्टीक अॅसिडचा त्वचेसाठी चांगला फायदा होतो. २ चमचे साखर आणि १ चमचा दूध घेऊन त्याचे मिश्रण बनवावे. मग हे मिश्रण चेहऱ्यावर चोळावे. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. असे करायचे नसल्यास कापसाचा बोळा या मिश्रणात भिजवून चेहरा पुसून काढल्यास त्याचाही चांगला फायदा होतो.

३. दह्याचा फेसपॅक

दह्यात प्रोबायोटीक्स आणि लॅक्टीक अॅसिड असते. त्याचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी उपयोग होतो. तसेच दह्यामुळे त्वचेचा काळेपणा दूर होतो आणि पोषणही होते. त्यामुळे १५ मिनिटे चेहरा दही लावून ठेवावा आणि मग साध्या पाण्याने धुवून टाकावा.

४. मध आणि केळ्याचे स्क्रबर

केळ्यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते, तर मधामध्ये अँटीबॅक्टेरीयल घटक असल्याने त्याचा त्वचा स्वच्छ होण्यास उपयोग होतो. १ केळे आणि ३ चमचे मध यांचे मिश्रण करुन ते चेहऱ्यावर लावावे. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा.

५. पपई

पपईमध्ये आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त घटकांचा समावेश असतो. पपईमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंटसमुळे त्वचेचे पोषण होण्यास मदत होते. पपईचा गर बारीक करुन तो चेहऱ्याला लावून ठेवावा. १५ मिनिटांनी चेहरा धुतल्यास चेहरा उजळण्यास मदत होते.