16 February 2019

News Flash

‘या’ गोष्टी केल्यास मेंदूचा थकवा होईल दूर

सोप्या आणि सहज करता येण्याजोग्या टिप्स

प्रातिनिधिक छायाचित्र

दिवसभाराच्या कामाने किंवा वेगवेगळ्या ताणांमुळे तुमचा मेंदू अनेकदा थकतो. मग हा ताण असह्य झाला की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. अशा परिस्थितीत अनेकदा मनात नकारात्मक विचार यायला लागतात. अशावेळी सगळे सोडून कुठेतरी लांब जावे किंवा काहीच करु नये असे तुम्हाला वाटेत. ही अवस्था होण्याची अनेक कारण असतात. कधी ही कारणे अगदी क्षुल्लक असतात तर कधी मोठी असू शकतात. दिवसरात्र काम करणारा मेंदू पूर्णपणे थकून जातो. त्याला सतत ऊर्जा देण्यासाठी आणि आनंदी तसेच ताजेतवाने ठेवण्यासाठी काही उपाय करण गरजेचे असते. अगदी छोट्या गोष्टी केल्यास तुम्ही या समस्येपासून नक्कीच आराम मिळवू शकता.

कोडी आणि शब्दकोडी

वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवणे हा डोक्यासाठी एक उत्तम आराम असू शकतो. यामुळे थकलेल्या मेंदूला वेगळ्या प्रकारचे खाद्य मिळते. यामध्ये सुडोकु, शब्दकोडी किंवा कोड्यांचे इतर प्रकार यांचा समावेश असतो. डोक्याला आव्हान मिळाल्याने तो नव्याने तरतरीत होतो आणि त्याला चालना मिळते. थकलेल्या मेंदूला आराम मिळण्यासाठी सगळेच खेळ उपयुक्त ठरत नाहीत तर कोडी सोडविणे मात्र निश्चित सकारात्मक काम करतात.

झोपेचे गणित सांभाळा

आरोग्याच्या बहुतांश तक्रारींवर वेळेवर आणि पुरेसे झोपणे अतिशय आवश्यक असते. मेंदूसाठीही झोप पूर्ण होणे उपयुक्त ठरते. तुमची झोप पूर्ण झाली असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. तसेच यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास आणि विचार करण्याची क्षमता वाढण्यासही मदत होते. मेंदू शांत आणि ताजातवाना राहण्यासाठी पुरेशी झोप हा उत्तम उपाय आहे. किमान ८ तासांची झोप व्यक्तीला आवश्यक असते. मात्र हे प्रमाण व्यक्तीनुसार बदलू शकते.

स्मरणशक्तीचे व्यायाम

स्मरणशक्ती चांगली असेल तर त्याचा आपल्याला अनेक ठिकाणी फायदा होतो. मात्र मेंदू थकल्याने आपली स्मरणशक्ती कमी होत जाते. अशावेळी स्मरणशक्तीचे काही व्यायाम करणे म्हणजेच खेळ खेळणे नक्कीच उपयुक्त ठरु शकते. अगदी लहान आणि सोप्या खेळांपासून तुम्ही सुरुवात करु शकता. हे खेळ तुम्ही एकटे, कुटुंबिय किंवा मित्रमैत्रीणी कोणासोबतही खेळू शकता. त्यामुळे मेंदूला एकप्रकारचा व्यायाम होतो आणि तो नव्या दमाने काम करण्यास तयार होतो.

नवनवीन लोकांच्या भेटी घेणे

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असल्याने त्याला सतत माणसांत राहणे आवडते. दैनंदिन जीवनात आपण ठराविक लोकांनाच रोज भेटत असतो. त्याच लोकांना भेटून आणि त्यांच्याशी बोलून काहीवेळा कंटाळवाणे वाटू शकते. अशावेळी वेगळ्या क्षेत्रातील, वेगळ्या पद्धतीच्या लोकांना भेटणे उपयुक्त ठरु शकते. त्यामुळे मेंदूची ऊर्जा वाढण्यास आणि तो अॅक्टीव्ह राहण्यास मदत होते.

First Published on July 12, 2018 7:04 pm

Web Title: how to keep your brain energized happy and active easy and important tips