भाज्या व फळे

तीळ व गुळासारख्या स्निग्ध व उष्ण पदार्थांबरोबर थंडीत फळे व भाज्याही भरपूर खाव्यात. थंडीच्या दिवसांत भाज्या खूप ताज्या व छान मिळतात.

लाल रंगाच्या भाज्यांमध्ये बिटाकॉरोटीन (vi+A) असते.
टोमेटोमध्ये लायकोपिन (Lycopene) असते.
हिरव्या भाज्यांमध्ये क्लटोफिल फायबर (तंतू), लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोटेट, व्हिटॅमिन सी वगैरे घटक असतात.
हळदीमुळे रक्त शुद्ध होते.
धान्यांतून (हुरडा) प्रोटीन तसंच काबरेहायड्रेट्स मिळतात.
वांग्यात फायटोकेमिकल्स (phytochemicals) असतात.
फळांत काबरेहायड्रेट्स,फायबर तसंच व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे उर्जा मिळते.

सर्व भाज्या व फळांमध्ये शरीरास आवश्यक वरील पोषक मूल्य असल्यामुळे संसर्गजन्य रोग कॉन्सर, हृदयरोग यांपासून शरीराचे संरक्षण होते.

मिक्स भाजी

साहित्य:

वांगी – ३-४ बारीक चिरून, बटाटे – २ बारीक चिरून, वालपापडी – १ वाटी बारीक तोडलेली, तुरीचे दाणे – अर्धी वाटी वाफवलेले, सुरण – १ वाटी चौकोनी चिरून वाफवलेले, लिंबाचा रस – अर्ध्या लिंबाचा रस, मीठ-साखर- आवडीप्रमाणे, ओवा – अर्धा चमचा, तेल – पाव वाटी, ओले खोबरे – अर्धी वाटी, ओला लसूण – १ लहान जुडी, हिरवी मिरची – ४-५ किंवा आवडीप्रमाणे, कोथिंबीर – अर्धी जुडी (सर्व एकत्र बारीक वाटावे.)

कृती:

कढईत तेल गरम करा. त्यावर ओवा टाका. लगेच वांगं, बटाटा, वालपापडी, तुरीचे दाणे टाका. चांगले परता. झाकण ठेवून एक वाफ आणा. नंतर त्यावर वाटण टाका. मीठ, साखर टाका. परता. तेल सुटल्यावर त्यात सुरण व अर्धी वाटी पाणी टाका. उकळी आणा. शेवटी अर्ध्या लिंबाचा रस टाका.

चपाती-भाकरीबरोबर गरम सव्‍‌र्ह करा.

हुरडा उपमा

साहित्य:

ज्वारी हुरडा- ३ वाटय़ा, कांदा – १ बारीक चिरून, हिरवी मिरची – २-३ बारीक चिरून, कडीपत्ता – १ काडी, गाजर – १ वाटी किसलेले, मीठ-साखर – आवडीप्रमाणे, तेल – पाव वाटी, बारीक शेव – एक टेबल स्पून (सर्व्हिंगसाठी), शेंगदाणा चटणी – १ चमचा (सव्‍‌र्हीगसाठी),

फोडणी साहित्य – अर्धा चमचा मोहरी- पाव चमचा हिंग

कृती:

कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी टाका. तडतडल्यावर त्यात हिंग टाका. त्यावर मिरची, कडीपत्ता व कांदा टाका, परता. कांदा गुलाबी झाल्यावर त्यावर मीठ-साखर टाका. परता. त्यावर किसलेले गाजर टाका, परता. शेवटी ज्वारीचा हुरडा टाका, चांगला परता. गॅस बारीक करून झाकण ठेवा व चांगली वाफ आणा.

गरम सव्‍‌र्ह करा. सव्‍‌र्ह करताना वरून बारीक शेव व दाण्याची चटणी घाला.

वांगं- बटाटा थरांचा पुलाव

साहित्य:

तयार मोकळा भात – ३ वाटय़ा, लहान वांगी – ४-५ गोल काप करा, लहान बटाटा – ४-५ गोल काप करून, कांदे – ४ लांब चिरून कुरकुरीत तळलेला, कांदे – २-३ गोल काप, आलं, लसूण, मिरची पेस्ट – एक टेबलस्पून, हळद, तिखट – अर्धा चमचा प्रत्येकी, मीठ – आवडीप्रमाणे, तांदळाचे पीठ – अर्धा वाटी, ओला लसूण पात – ४-५ काडय़ा बारीक चिरलेला,  पुदिना – १०-१५ पाने चिरून, चाटमसाला – २ चमचे, खडामसाला – मिरी, लवंग, दालचिनी, तेल – १ वाटी, दूध – अर्धा वाटी, साजूक तूप – पाव वाटी, काकडी-टोमॅटो रायते – १ वाटी.

कृती:

तेलात खडा मसाला टाका. त्यावर धुतलेले तांदूळ टाका, परता. मीठ टाकून मोकळा भात शिजवून घ्या. बाजूला ठेवा. आलं- लसूण मिरची पेस्ट, मीठ, हळद, तिखट एकत्र करून वांगी व बटाटय़ाच्या कापांना लावून ठेवा. नंतर हे काप तांदळाच्या पिठात घोळवून श्ॉलोफ्राय करा. बाजूला ठेवा. एका पसरट भांडय़ात खाली तेल टाका. त्यावर कांद्याचे गोल काप ठेवा व त्यावर ३-४ चमचे दूध टाका. त्यावर १ वाटी भाताचा थर लावा. भातावर बारीक चिरलेली लसूण पात, पुदिना, तळलेला कांदा, थोडा थोडा घाला. त्यावर चाट मसाला भुरभुरा व शेवटी तळलेले वांग्याचे काप ठेवा. परत १ वाटी मोकळा भाताचा थर लावा. भातावर परत लसणाची पात, पुदिना, तळलेला कांदा, चार मसाला टाका. त्यावर तळलेल्या बटाटय़ाचा थर लाव. शेवटी या थरांवर वरून खाली चार पाच भोकं पाडा. त्यातून साजूक तूप टाका. भांडय़ाला फॉईल किंवा झाकण ठेवा. प्रथम मध्यम आचेवर व नंतर गॅस लहान करून दणदणीत वाफ आणा.

रायत्याबरोबर हा पुलाव गरम गरम सव्‍‌र्ह करा.

ओली हळद, आले लोणचे

साहित्य:

ओली हळद – पाव किलो किसून किंवा बारीक चिरून, आलं – १०० ग्रॅम, हिरवी मिरची – ३-४ बारीक चिरलेली, तेल – अर्धा वाटी, मोहरी – अर्धा चमचा, लिंबू – ५-६ लिंबाचा रस, मीठ – पाव वाटी

कृती:

प्रथम ओली हळद व आलं स्वच्छ धुवा. रुमालाने कोरडे करा. हळद व आल्याची सालं काढून किसून घ्या. काचेच्या बाऊलमध्ये एकत्र करा. त्यातच मिरचीचे तुकडे टाका. मीठ कोरडे भाजा. त्यात घाला. लिंबाचा रस घाला. फोडणीसाठी तेल गरम करा. त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर गॅस बंद करा. फोडणी गार झाल्यावर तयार लोणच्यावर टाका. चांगली एकत्र करा व काचेच्या बाटलीत भरून ठेवा. हे लोणचे अतिशय रुचकर लागते. हळदीमुळे रक्त शुद्ध होते. थंडीच्या दिवसात ओली हळद जरूर खावी.
अलका फडणीस – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा