सुरक्षित आणि बांधील परतावा मिळवण्यासाठी पारंपरिक गुंतवणूकदारांमध्ये बँक मुदत ठेवी (फिक्स डिपॉझिट) सर्वात लोकप्रिय आहेत. संपूर्ण मुदतीसाठी मिळणाऱ्या व्याजाची हमी असते त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीची किंमत माहीत असते. पण याचा नीट फायदा घेण्यासाठी योग्य मुदत ठेव निवडणे फार महत्वाचे असते. आज आपण असे काही घटक पाहणार आहोत जे तुम्हाला मुदत ठेवींची तुलना करण्यास मदत करतील.

बँकानी देऊ केलेला व्याजदर

मुदत, रक्कम आणि गुंतवणूकदाराच्या वयाला (वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे किंवा नाही हे पाहाता) अनुसरून प्रत्येक बँक व्याजाचा दर देऊ करत असते. साधारणपणे, 7 दिवस ते 10 वर्षे मुदतीसाठी व्याजाचा दर वार्षिक ४ टक्के ते ८ टक्के असतो. पण १ कोटीपेक्षा अधिक ठेवीसाठी बँक अधिक व्याज दर देऊ करतात. वरिष्ठ नागरिकांना बँकांच्या नियमित व्याजदरापेक्षा ०.५ टक्के अधिक दराने व्याज मिळते. त्यामुळे मुदत ठेवीचा विचार करत असताना तुमच्या रकमेवर, तुमच्या मुदतीसाठी आणि तुमच्या वयोगटासाठी बँकांकडून कुठल्या दराने व्याज मिळेल ते अवश्य पाहा.

बँकेची विश्वसनीयता

केवळ व्याजाचा दर पाहून मुदत ठेवीसाठी बँक नक्की करु नका. बँकेची विश्वसनीयता सुद्धा लक्षात घ्या. राष्ट्रीयकृत बँकानी आजपर्यंत आपल्या ग्राहकांना एकदाही मुदत ठेव परत करण्यास नाही म्हटले नसले तरीही बँकेतील मुदत ठेवीचा विमा १ लाखापर्यंतच असतो हे लक्षात ठेवा. एका बँकेवर अवलंबून न राहता तुम्ही तुमची मुदत ठेव अनेक बँकांमध्ये ठेवू शकता. याचा एक फायदा असा ही आहे की आर्थिक निकडीच्या वेळी तुम्हाला संपूर्ण रक्कम एकदम काढावी लागत नाही.

व्याजाची गणना करण्याचा कालावधी

तुमच्या गुंतवणुकीवर व्याजाची गणना कशी केली जाते ते पाहा. बहुतांश बँकांच्या मुदत ठेवींवर दर तीन महिन्यांनी व्याजाची गणना केली जात असली, तरी काही बँका मासिक गणना करण्याचा पर्यायसुद्धा देतात. जर तुम्हाला मासिक आणि सहामाही व्याज गणनेतून निवड करायची असेल आणि व्याजाचा दर समान असेल, तर मासिक व्याज गणना निवडा. कारण अशाने दीर्घ मुदतीत तुम्हाला अधिक परतावा मिळू शकेल.

कर लाभ

काही बँका कर-लाभ देणारी मुदत ठेव ऑफर करतात, ज्यात तुम्ही १.५ लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता. ज्यावर तुम्हाला कलम 80 (सी) प्रमाणे कर-लाभ मिळू शकतो. पण अशा मुदत ठेवींतून ५ वर्षांआधी तुम्ही पैसा काढू शकत नाही, तसेच अशा मुदत ठेवींना गहाण ठेऊन त्यावर कर्ज मिळू शकत नाही. अशा मुदत ठेवीवर मिळणारे व्याज सुद्धा कर-पात्र असते.

वेळेआधी पैसे काढल्यास दंड

सर्वच बँकांच्या नियमांप्रमाणे मुदती आधी पैसे काढून घेतल्यास काही दंड भरावा लागतो. पण आताशा काही बँका असा दंड आकारत नाहीत. आश्चर्य म्हणजे अशा काही बँकांचे व्याजाचे दर सुद्धा चांगले आहेत. म्हणून, निवड नक्की करण्याआधी असा दंड किती बसतो ते सुद्धा पाहा. एक आणखी लक्षणीय मुद्दा असा की फक्त अधिक व्याज दर मिळवण्यासाठी ठेवीची मुदत वाढवू नका. जर तुम्हाला लवकरच पैसे काढून घेण्याची गरज पडणार असेल तर तुम्हाला मुदती आधी पैसे काढावे लागतील आणि त्यामुळे तुमचा परतावा १ टक्क्याने कमी बसेल. दंड लागू नये यासाठी कमी कालावधीसाठी मुदत ठेव करा आणि मुदत पूर्ण झाल्यावर पुन्हा गुंतवणूक करा.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार