मोबाईल फोन हरवणे किंवा चोरीला जाणे ही आता अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. दिवसागणिक अनेकांचा फोन कुठेतरी विसरतो, पडतो नाहीतर चोरीला जातो. सध्या इंटरनेटच्या वापरामुळे स्मार्टफोन हा आपल्यातील अनेकांसाठी श्वासाप्रमाणे महत्त्वाचा असतो. मग हा फोन हरवल्यावर आपण एकदमच हेल्पलेस होतो. व्हॉटसअॅपसारख्या सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असणाऱ्यांसाठी मोबाईल नसणे ही जणू शिक्षाच होऊन बसते. अशांसाठी एक खूशखबर आहे. तुमचा मोबाईल हरवला तरीही आता तुम्हाला तुमचे व्हॉटसअॅप अकाऊंट रिस्टोअर करुन ठेवता येणार आहे. आता ते नेमके कसे पाहूयात…

१. सुरुवातीला तुमच्या व्हॉटसअॅपचा गैरवापर होत नाही ना ते तपासून पाहा. नुकतीच व्हॉटसअॅपद्वारे पेमेंट करण्याची सुविधा सुरु झाल्याने तुमचे व्हॉटसअॅप दुसरे कोणी वापरत नाही ना याची खात्री करणे आवश्यक आहे.

२. सगळ्यात आधी तुम्ही ज्या मोबाईल कंपनीची सेवा घेत असाल त्यांच्याशी संपर्क करुन तुमची सेवा खंडीत करण्यास सांगा. ही सेवा बंद झाल्यानंतर तुमचा फोन कोणाच्याही हातात असेल तरीही त्यावरुन काहीही करता येणार नाही. कारण कोणतेही व्यवहार करण्यासाठी सध्या एसएमएसवर आलेला ओटीपी क्रमांक द्यावा लागतो.

३. सिमकार्ड लॉक केल्यानंतर तुम्ही तुमचे व्हॉटसअॅप अकाऊंट दुसऱ्या डिव्हाईसवर सुरु करु शकता. यासाठी सध्या असणाऱ्या मोबाईल क्रमांकाचा वापर केल्यास तो जास्त फायदेशीर ठरतो. व्हाॉटसअॅप एकावेळी एकाच ठिकाणी सुरु राहू शकते हे लक्षात ठेवा.

४. आणखी एक पर्याय म्हणजे सुरक्षिततेसाठी तुम्ही व्हॉटसअॅप टीमला मेलद्वारे तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला आहे हे कळवू शकता. यासाठी “Lost/stolen: Deactivate my account” असे तुमच्या फोन क्रमांकासह लिहा. यामध्ये तुमच्या देशाचा कोड क्रमांकही द्यायला विसरु नका. यासाठी android_web@support.whatsapp.com या मेल आयडीचा वापर करु शकता.

५. याठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ती म्हणजे मोबाईलमध्ये सिमकार्ड नसले तरीही वायफायवर व्हॉटसअॅपवर चालू शकते. त्यामुळे व्हॉटसअॅप टीमशी संपर्क करुन आपले अकाऊंट डिअॅक्टीवेट करणे आवश्यक आहे. या काळात तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही डिव्हाईसवरुन व्हॉटसअॅप वापरता येणार नाही. हे अकाऊंट पुन्हा सुरु करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी जावा लागतो.