नाताळच्या सुट्ट्या जवळ आल्या की कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींबरोबर फिरायला जाण्याचे प्लॅन रंगतात. कधी ४ दिवसांची लहान ट्रीप तर कधी १० ते १२ दिवसांची मोठी ट्रीप करण्याचा बेत ठरतो. रोजच्या रुटीनमधून थोडा ब्रेक म्हणून अशी सहल नक्कीच आपल्याला रिफ्रेश करणारी ठरते. पण हिवाळ्यात प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. आता नेमकी कोणती आणि कशी काळजी घेतल्यास आपला प्रवास आणि एकूणच ट्रीप चांगली होऊ शकते पाहूयात…

१. हिवाळ्यात थंडीमुळे प्रवासादरम्यान पाय आणि शरीराचे सांधे आखडण्याची शक्यता असते. त्याचा नंतर त्रास होऊ शकतो. त्यामुळे ठराविक वेळाने गाडी असेल तर ती थांबवून खाली उतरा. रेल्वेमध्ये असाल तर एखादी चक्कर मारुन या. त्यामुळे पायाचे स्नायू मोकळे राहण्यास मदत होईल.

२. प्रवासात गार पाणी किंवा शीतपेये प्यायल्याने घसा खराब होण्याची शक्यता असते. तसेच बाहेर गेलो असल्याने तेलकट पदार्थही खाण्यात येतात. अशावेळी घसा दुखू नये यासाठी शक्यतो कोमट पाणी पीत राहा. ते शक्य नसल्यास  चहा किंवा कॉफी घेतल्यानेही घशाला आराम मिळतो.

३. थंडीमुळे सर्दी- खोकला होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी आवश्यक असणारी घरगुती औषधे, सर्दीसाठी उपयुक्त एखादा बाम, घशासाठी आराम देणाऱ्या गोळ्या घेऊन ठेवा. नवीन ठिकाणी कोणी आजारी पडले आणि लगेच डॉक्टर गाठणे शक्य नसेल  तर या औषधांचा उपयोग होतो.

४. तुम्ही जात असलेल्या ठिकाणाच्या तापमानाची किमान माहिती करुन घ्या आणि त्यानुसार जास्तीचे कपडे सोबत ठेवा. थंडीला पुरतील असे जास्तीचे उबदार कपडे सोबत ठेवा. सोबत वयस्कर व्यक्ती आणि लहान मुले असल्यास शालीसारखे कपडे कोणीही वापरु शकते.

५. बर्फाळ प्रदेशात स्नो फॉल पाहण्यासाठी जाणार असाल तर थोडी जास्त काळजी घ्या. बर्फावर जास्त काळ चालू नका. त्यामुळे स्नायू बधीर होऊन त्रास होण्याची शक्यता असते. याशिवाय प्रवास करताना कानावर गार वारे बसणार नाही याची काळजी घ्या. त्यानेही लगेचच सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते.

६. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटते. तसेच आगही होते. काहींना खाजवल्यानंतर रक्त येते. त्यामुळे कोल्डक्रिम, तेल, लीपबाम यांसारख्या त्वचेला मऊ ठेवतील अशा गोष्टी सोबत ठेवा. त्याचा निश्चितच फायदा होतो.