सध्या फॅशनबाबत आपल्यातील अनेकजण बरेच सजग असतात. बाजारात ट्रेंड असणारी फॅशन आपल्याला करता यावी यासाठी आपली धडपड सुरु असते. आपण काय आणि कसे कपडे घालतो याकडे अनेकांचे लक्ष असते. आता चांगल्या गुणवत्तेचे कपडे घेतले तरीही त्याचा वापर कसा करायचा हेही तितकेच महत्त्वाचे असते. ते धुताना, इस्त्री करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. बहुतेक वेळा कपड्यांना उन्हात वाळवल्याने त्याचा रंगही जातो. मात्र तुमच्या कपड्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवल्यास आणि त्याप्रमाणे काळजी घेतल्यास कपडे चांगले राहण्यास मदत होते. पाहूयात काय आहेत या महत्त्वाच्या टिप्स…

१. भडक रंगाचे कपडे वेगळे धुवा

आपण अनेकदा कपडे धुवायला काढतो आणि घाईत सगळे कपडे एकत्रित धुतो. मात्र यामुळे एखाद्या गडद रंगाच्या कपड्याचा रंग इतर कपड्यांना लागण्याची शक्यता असते. त्यामुळे गडद रंगाचे कपडे लक्षात घेऊन ते वेगळे भिजवा. अन्यथा विनाकारण इतर कपडे वाया जाऊ शकतात.

२. कसे पाणी वापराल?

कपड्यांचा मळ निघावा आणि ते जास्त स्वच्छ निघावेत यासाठी ते गरम पाण्यात धुतल्यास उपयोग होतो असा अनेकांचा समज असतो. मात्र गरम पाण्यात कपडे धुतल्यास त्यांची चमक कमी होते आणि ते फिकट पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कपडे गार पाण्याने धुवावेत.

३. कपडे धुण्यास काय वापरावे ?

कपडे धुण्यासाठी फॅब्रिक कंडिशनरचा वापर करा. नाजूक कपडे धुण्यासाठी शक्यतो फॅब्रिक कंडिशनरचा वापर करावा. जर तुमच्या कपड्यांना डाग लागले तर कपडे धुताना मिठाचा वापर करा. मीठात असणाऱ्या गुणधर्मामुळे डाग निघून जाण्यास मदत होते.

४. ड्रायरचा वापर टाळा

अनेकदा कपड्यांची घाई असल्याने तसेच ते वाळत टाकण्यास योग्य आणि पुरेशी जागा नसल्याने मशीनला लावलेले कपडे ड्रायरला सुकवले जातात. मात्र ड्रायरच्या वापराने कपड्यांचा रंग उतरतो. त्यामुळे ड्रायरचा वापर करण्यापेक्षा मोकळ्या हवेत कपडे सुकवा. यामुळे कपड्याचा पोत आणि रंग उतरत नाही.

५. कपड्यांना उन्हात वाळत घालू नका

कपडे नाजूक फॅब्रिकचे असतील तर ते उन्हात वाळत घालू नका. कारण त्यामुळे कपड्याचा पोत बिघडून रंग जाण्याची शक्यता असते. याबरोबरच पाण्यातून काढल्यानंतर कपड्यांना योग्य पद्धतीने पिळून काढा. त्यांना झटका आणि कपडे उलटे करून तारेवर वाळत घाला. त्यामुळे कपड्याला हवा लागते आणि ते नीट सुकतात.