आपले केस लांब आणि घनदाट असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटते. मग त्यासाठी अनेक उपाय अवलंबले जातात. काही वेळेस काही घरगुती उपायांनी तर अनेकदा बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरुन केस जास्तीत जास्त चांगले कसे राहतील यासाठी प्रयत्न केला जातो. केसांचे आरोग्य चांगले राहण्यामध्ये वातावरण, केस धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, आहार, केसाला लावली जाणारी शॅम्पू, कंडिशनर, तेल यांसारखी उत्पादने यांचा समावेश असतो. हे केस लांब आणि सिल्की, शायनी राहण्यासाठी करता येतील असे काही सोपे उपाय…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. आठवड्यातून दोनदा तेल लावा – शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच केसांचे योग्य पद्धतीने पोषण होणे अतिशय गरजेचे असते. केसांच्या मूळांना तेल लावल्याने केसांच्या वाढीसाठी आवश्यक ती पोषणमूल्ये मिळतात. त्यामुळे केस लांब आणि मजबूत होण्यास मदत होते. केसांना कोमट तेल लावल्यानंतर केसांच्या मूळांना हलक्या हाताने मसाज करा. तेल लावल्यानंतर टॉवेल गरम पाण्यात टाकून तो पिळून केसांना बांधा. असे १० मिनिटांसाठी केल्यास केसांमध्ये तेल योग्य पद्धतीने मुरण्यास मदत होईल. दोन तासांनी केस शॅम्पूने धुवा. अशापद्धतीने तेल लावल्यामुळे रक्तप्रवाह चांगला होण्यासही मदत होते.

२. नियमित मसाज करा – मसाज हा कोणत्याही अवयवासाठी चांगलाच असतो. केसांच्या मुळांशी योग्य पद्धतीने केलेला मसाज फायदेशीर असतो. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मसाजचा फायदा होतो. खोबरेल तेल किंवा बदाम तेलाने मुळांना मसाज केल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यामध्ये तुम्ही तुमच्या हाताने मसाज करुन घेऊ शकता. कुटुंबातील व्यक्तीकडून किंवा मित्र-मैत्रीणींकडूनही डोक्याला मसाज करुन घेऊ शकता. याशिवाय सध्या पार्लरमध्येही मसाज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

३. रोज केस धुणे टाळा – केसांमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारे तेल केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. अनेकांना विशेषतः मुलींना केस चांगले दिसावेत यासाठी रोज केस धुण्याची सवय असते. मात्र अशामुळे केसात निर्माण होणारे नैसर्गिक तेल नष्ट होते आणि केसांची गुणवत्ता खराब होते.

४. प्रत्येकवेळी कंडीशनर वापरा – केस चांगले ठेवायचे असतील तर कंडीशनर वापरणे अतिशय आवश्यक असते. कंडीशनरमुळे केसात आर्द्रता राहण्यास मदत होते आणि कोरडेपणा कमी होतो. प्रदूषण आणि धूळ यांपासून केसांचे संरक्षण होण्यास मदत होते. आपल्या केसांचे पोत लक्षात घेऊन त्यानुसार योग्य तो शॅम्पू आणि कंडीशनर यांची निवड करणे हेही महत्त्वाचे आहे.

५. केस हलकेपणे कोरडे करा – केस धुतल्यानंतर साधारणतः ते अतिशय हलक्या हाताने कोरडे करणे गरजेचे असते. जोरजोरात केस पुसल्यास ते तुटण्याची शक्यता जास्त असते. अतिशय पातळ टॉवेल किंवा जुना टी-शर्ट केस पुसण्यासाठी वापरावा. अनेकींना केस जोरजोरात झटकण्याचीही सवय असते. मात्र त्यामुळे केस तुटू शकतात. तसेच ओले केस विंचरु नयेत. हातांनी हे केस तुम्ही सारखे करु शकता मात्र विंचरल्याने ते तुटण्याची शक्यता असते.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to take care of your hairs important tips
First published on: 22-08-2017 at 11:00 IST