‘बाप्पा मोरया’च्या घोषात गणरायांचे आगमन झाले आहे. घरोघरी बसलेल्या गणेशांचे साग्रसंगीत पूजन होऊ लागले आहे. गल्लोगल्लीतली सार्वजनिक आणि नावाजलेल्या मोठमोठ्या सार्वजनिक मंडळांकडे आता गर्दीचा महापूर सुरू होईल. अशा मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात आपल्या आरोग्याला विसरु नका. गर्दीत फिरणे, अवेळी जेवण, गोडाधोडाचे जेवण यांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पण सणाचा पूर्णपणे आनंद लुटायचा असेल तर काही गोष्टींची मात्र आवर्जून काळजी घ्यायला हवी.

– वैयक्तिक काळजीगणेशोत्सव नेहमी पावसाळ्यात येतो. यावेळी ढगाळ हवामान आणि उच्च आणि निम्न तापमानातील फरकामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असलेल्या विषाणूजन्य साथींचा फैलाव सुरू झालेला असतो. अशा रुग्णांनी गर्दीमध्ये फिरल्यास त्यांचा आजार तर बळावतोच, पण त्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींना त्या आजाराचा संसर्ग होतो. अशामुळे या काळात साथी वेगाने पसरतात.

– निरोगी व्यक्तींनी गर्दीत फिरताना मास्क वापरावा किंवा तोंडावर स्कार्फ गुंडाळावा.

– ज्यांना अस्थमा (दमा), जुना खोकला, उच्च रक्तदाब आहे अशा व्यक्तींनी गर्दीत गेल्यास आजारांचे जोरदार अॅटॅक येऊ शकतात.

– गणेशोत्सवाच्या काळात मावा आणि माव्याच्या पदार्थांची खरेदी केली जाते. जर हे पदार्थ शिळे असतील, तर पदार्थांच्या सेवनामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे असे पदार्थ खरेदी करताना, ताजे व खाण्यास योग्य आहेत, हे तपासूनच त्याची खरेदी करावी किंवा त्याचे वाटप करावे. असे पदार्थ प्रमाणित खाद्यविक्रेत्यांकडूनच घ्यावेत.

– गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले खाद्यपदार्थांची विक्री करतात. हे पदार्थ उघड्यावर असतात आणि त्यांच्या खाद्याच्या स्वच्छतेची अजिबात खात्री नसते. अशा खाण्याने उलट्या, जुलाब, आमांश, टायफॉईड, कावीळ असे आजार नक्कीच उद्भवतात. त्यामुळे या काळात फेरीवाल्यांकडील खाद्यपदार्थ टाळावेत.

– सार्वजनिक आरोग्याबाबात प्रत्येकाने आपल्या घाराभोवातली उंदीर, डास, माश्या यांचा उपद्रव होणार नाही, याची काळजी घ्यावी. यामुळे लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, अतिसार, कावीळ अशा साथीच्या आजारांचा फैलाव होणार नाही.

– मोकळ्या जागेवरील माती, कचरा काढून घेण्याची काळजी घ्यावी. म्हणजे गणेशोत्सवाच्या कालावधीत संपूर्ण स्वच्छता राखली जाईल आणि आरोग्यास धोका निर्माण होणार नाही.

 

डॉ.अविनाश भोंडवे

फॅमिली फिजिशियन