News Flash

चष्मा वापरताना ‘या’ गोष्टींचा विचार करा, नाहीतर…

काळजी घ्यायलाच हवी

आपल्याला चष्मा लागला हे कळाल्यावर आधी मी चष्म्यात कसा दिसेन किंवा कशी दिसेन याबाबतच चर्चा होते. मग कित्येक दिवस चष्मा लागलाय हे माहित असूनही चष्मा खरेदी करणे टाळले जाते. मग कोणती फ्रेम घ्यावी हे शेवटपर्यंत कळत नाही. आणि शेवटी निवडलेली फ्रेम नंतर चेहऱ्यावर धड बसत नाही. कुठेतरी टोचतंय, दाब पडतोय, त्वचेवर डाग निर्माण होतोय, चष्मा जड झालाय, खाली घसरतोय अशा अनेक तक्रारी मागे लागतात. एकूणच काय चष्मा वापरणे हा काही सुखद अनुभव रहात नाही. पण चष्म्याची फ्रेम निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर चष्मा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनतो आणि ही अडचण न राहता एक मस्त फॅशन अक्सेसरी म्हणून वापरता येतो.

– चष्म्याची देखभाल करण्याच्या काही सोप्या युक्त्या
१. चष्मा पुसताना थोडा ओला करून घ्यावा. साध्या पाण्याने धुतल्यास अधिक चांगले.

२. चष्मा पुसण्यासाठी मऊ सुती किंवा किंवा होजिअरीचे विशिष्ट कापड वापरावे. हे कापड देखील महिन्यातून एकदा स्वच्छ धुवावे.

३. शर्ट, कुर्ती, साडीचा पदर, हातरुमाल इत्यादी चष्मा पुसायला वापरू नयेत. या कपड्यांमधील धूळ चष्म्याच्या काचांवर ओरखडे आणायला पुरेशी असते.

४. चष्म्यावर तेलकट थर जमा झाल्यास, पाण्यात किंचित हात धुवायचा लिक्विड सोप घालून, त्याने चष्मा धुवावा.

५. चष्मा पुसताना, संपूर्ण काच एका बाजूने सलग दुसऱ्या बाजूला जात पुसावी. पुढे-मागे, गोलगोल काचेला रगडू नये.

६. चष्मा काढ-घाल करताना दोन्ही हातांचा वापर करावा. एका हाताने काढ-घाल केल्यामुळे चष्म्याचे संतुलन बिघडते.

७. महिन्या-दोन महिन्यातून कधीतरी, चष्मा सपाट पृष्ठभागावर ठेवून स्थिर राहतोय का नाही ते बघावे. एक पाय वर-खाली नाही याची खात्री करावी.

८. चेहऱ्यावर चष्मा भुवयांच्या तुलनेत सरळ बसतोय ना याची खात्री करावी.

९. वाकडा, सैल, खाली घसरणारा चष्मा लागलीच चष्म्याच्या कोणत्याही दुकानातून नीट करून घ्यावा. हे काम तांत्रिक कौशल्याचे आहे. यासाठी नेत्रतंत्रज्ञ आपली मदत करतात. घरच्या घरी चष्मा दुरुस्ती करायला जाऊ नये.

१०. काच फुटली, ओरखडे पडले, धूसर, पांढरी झाली तर लगेच बदलून घ्यावी. रंगीत/ रंगछटा बदलणाऱ्या काचा असल्यास दोन्ही काचा बदलाव्यात जेणेकरून दोन्ही काचांचा रंग सारखा राहील.

११. धातूची फ्रेम असल्यास, नाकावर स्थिरावणाऱ्या सिलिकॉनच्या / प्लास्टिकच्या मऊ तक्क्या साधारण सहा-आठ महिन्याने बदलून घ्याव्यात. यामुळे नाकावर काळे डाग, खड्डे पडण्याची शक्यता कमी होते.

१२. चष्मा डोळ्यासमोरून काढून ठेवायचा झाल्यास त्याच्या डबीत, सुरक्षित जागी ठेवावा.

१३. चष्मा हरवला, विसरला, किंवा फुटला की फार गैरसोय होते. ती टाळण्यासाठी, किमान एक साधा चष्मा जास्तीचा बनवून ठेवावा.
फॅशन म्हणून अति लहान किंवा अति मोठी फ्रेम घेणे दृष्टीला बाधक असू शकते. डोळ्याचे ऑप्टीकल केंद्रबिंदू हे फ्रेमच्या भूमितीय केंद्रबिंदुशी जुळले तर ती फ्रेम चष्म्यासाठी सर्वात योग्य. शिवाय दूरवर आणि जवळच्या अंतरात बघताना, मान न हलवता, नजर फ्रेमच्या आतून गेली पाहिजे. विशेषतः लहान मुलांमध्ये दृष्टीची वाढ होत असताना अशी योग्य आकारमानाची फ्रेम घेणे महत्वाचे. शिवाय रोजच्या वापराला फ्रेम दणकट असावी. नाजूक प्रकारच्या फ्रेम फक्त सणावारांच्या पुरत्या ठेवाव्यात. त्या दिसायला जरी उत्तम असल्या तरी त्यामध्ये नंबरची काच योग्य प्रकारे डोळ्यासमोर राहील याची खात्री देता येत नाही. रोजच्या वापरात होणाऱ्या बारीकसारीक अपघातांना नाजूक फ्रेम टिकत नाहीत. दृष्टी आणि पैसा दोन्हीचे नुकसान करवतात!
विद्युत राजहंस, नेत्रतंत्रज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2017 1:32 pm

Web Title: how to take care while using spects
Next Stories
1 १० हजारांच्या बजेटमधील १० ‘स्मार्ट’ फोन
2 रुग्णवाहिकेपेक्षाही ड्रोनद्वारे हृद्यरुग्णांपर्यंत पोहोचणे सोपे
3 सॅमसंगच्या उत्पादनांवर फ्लिपकार्टच्या अनोख्या ऑफर्स
Just Now!
X