व्हॉटसअॅप हे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईतच झाले आहे. कधी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, कधी कामासाठी तर कधी चांगले फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी याचा उपयोग होतो. आपल्या यूजर्सना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देत व्हॉटसअॅप आकर्षित करत असते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले हे अॅप्लिकेशन वापरणे सोपे व्हावे यासाठी कंपनीकडून सातत्याने नवनवीन बदल करण्यात येत आहेत. यामध्ये वेगवेगळी अपडेटस देत ग्राहकांचा वापर सोपा करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या व्हॉटसअॅपने सोशल मीडियामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सध्या व्हॉटसअॅप १० प्रादेशिक भाषांना सपोर्ट करते. यात मराठी, हिंदी बंगाली, पंजाबी, तेलगू, तमिळ, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. पण, इतक्या भाषांमध्ये उपलब्ध असूनही हे अॅप अनेकांना आपल्या भाषेत (स्थानिक) भाषेत वापरता येत नाही. याचे कारण म्हणजे अशाप्रकारे प्रादेशिक भाषेत वापरता येते याबाबत आपल्याला माहिती नसते आणि असली तरीही त्याचे सेटींग कसे करायचे ते माहीत नसते. त्यामुळे आपल्याला जमेल तसे आपण आहे त्या भाषेत हे अॅप्लिकेशन वापरत राहतो. मात्र आपल्या प्रादेशिक भाषेत व्हॉटसअॅप कसे वापरता येईल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पाहूयात याबाबतच्या काही खास टीप्स…

१. व्हॉटसअॅप ओपन करा. यातील सेटींग्जवर क्लिक करा.

२. आता चॅटमध्ये जाऊन अॅप लॅंग्वेजवर क्लिक करा.

३. यामध्ये आपल्या उघडा स्मार्टफोनच्या क्षमतेनुसार भाषा येतील. त्यामधून आपल्या आवडीची आणि गरजेची भाषा निवडा. त्यात मराठी, हिंदी बंगाली, पंजाबी, तेलगू, तमिळ, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश असतो.

४. वापरकर्त्यांना एक सामान्य गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे व्हॉट्सअॅप हे आपल्या फोनचीच भाषा फॉलो करते. त्यामुळे आपल्या फोनची भाषा मराठी असेल तर, व्हॉट्सअॅपही मराठीत काम करते. पण, अॅण्ड्रॉईड आणि आयओएसनुसार आपल्याला वेगवेगळी पद्धत अवलंबावी लागले.

५. अँड्रॉईडच्या सेटींग्जमध्ये लँग्वेज आणि इनपुट या पर्यायामध्ये आपल्याला हवी असलेली भाषा निवडल्यावर संपूर्ण फोनमध्ये ती भाषा दिसते. हा बदल व्हॉटसअॅपलाही लागू होत असल्याने तुम्हाला व्हॉटसअॅपही फोनच्या निवडलेल्या भाषेत दिसते.