हा तोच काळ आहे ज्यावेळी वार्षिक बोनस आणि पगारवाढ तुमच्या पदरात पडते. काही लोकांना कर-परतावा म्हणजेच टॅक्स रिफंड सुद्धा मिळण्याची शक्यता असेल. थोडा अधिक पैसा हातात आलेला केव्हाही चांगलाच, पण बहुतांश लोक त्याचे काय करावे याचे नीट नियोजन करीत नाहीत. त्यामुळे आलेला पैसा एकतर खर्च होतो किंवा आपल्या बचत खात्यात तसाच राहतो. आता या अधिकच्या पैशाचे नेमके काय करावे यासाठी काही खास टीप्स…

कर्ज आगाऊ पूर्ण करा

जेव्हा तुमचे एखादे कर्ज सुरू असते, विशेषकरून ज्यावरील व्याज दर तुमच्या गुंतवणुकींवर मिळणाऱ्या परताव्याच्या दरापेक्षा अधिक असेल, तेव्हा ते कर्ज मुदतीपेक्षा आधी पूर्ण करणे हिताचे असते. तुमचे एकापेक्षा अधिक कर्जाचे हप्ते सुरू असतील, तर ज्यावर तुम्हाला कर-लाभ मिळत नाही असे कर्ज आधी पूर्ण करा. यात तुमच्या क्रेडिट कार्डावरील जुने देणे, वैयक्तिक कर्ज, वाहनकर्ज इत्यादी येतात. पगारवाढीचा वापर तुम्ही तुमच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यासाठी करू शकता. मुदतीआधी कर्ज पूर्ण करताना काही फी तर आकारली जाणार नाही ना याची खात्री मात्र करून घ्या.

घर खरेदी करण्यासाठी आगाऊ रक्कम जमवा

सध्या गृह कर्जे बरीच स्वस्त आहेत आणि स्थावर संपदेचा बाजार बऱ्यापैकी स्थिर आहे, तेव्हा जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करीत असलात, तर ही वेळ त्यासाठी चांगली आहे. तुमच्या बोनसचा वापर तुम्ही आगाऊ रक्कम वाढवण्यासाठी करू शकता. बँका साधारणपणे घराच्या किमतीची २० टक्के रक्कम तुम्हाला भरायला सांगतात. जर तुम्हाला ही रक्कम अधिक वाटत असेल, तर तुम्ही त्यात तुमच्या बोनसची भर घालू शकता. जर तुम्ही आधीच या रकमेची व्यवस्था केलेली असेल, तरीही त्यात बोनसची भर घालून तुम्ही तुमच्या कर्जाचा आकडा कमी करू शकता. जर तुम्हाला एका वर्षाच्या आत मोठी रक्कम उभी करायची असेल, तर तुम्ही हा पैसा मुदत ठेवीत किंवा लिक्विड म्युचुअल फंडात ठेवू शकता.

रिटायरमेंट फंडमध्ये गुंतवा

तुम्ही तुमचा बोनस सुरक्षिततेसाठी एखाद्या डेट फंडमध्ये, मध्यम परतावा घेण्यासाठी बॅलंस किंवा डायव्हर्सिफाइड फंडमध्ये किंवा अधिक परतावा मिळवण्यासाठी इक्विटी फंडमध्ये गुंतवून तुमच्या रिटायरमेंटचा निधी वाढवू शकता. तुम्ही तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि परताव्याच्या अपेक्षेनुसार गुंतवणूकीचा पर्याय निवडू शकता. पगारवाढीची रक्कम पीपीएफमध्ये किंवा एसआयपीद्वारे म्युचुअल फंडांत गुंतवण्याचा विचार करा.

कर-बचत करणारी गुंतवणूक वाढवा

जर तुम्ही कलम 80(सी) मधील बचतीची १.५ लाखाची मर्यादा गाठली नसेल, तर पगारवाढीची किंवा बोनसची रक्कम तुम्ही त्या कामासाठी वापरून पीपीएफ किंवा ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही आधीच कर-बचत करण्यासाठी कलम 80(सी) मध्ये पुरेशी गुंतवणूक केलेली असेल, तर तुम्ही एनपीएसमध्ये गुंतवणूक करू शकता. यात ५० हजार पर्यंत गुंतवणूक कलम 80 सीसीडी(1बी) प्रमाणे कर-मुक्त असते आणि ही रक्कम कलम 80(सी) मधील १.५ लाखाच्या व्यतिरिक्त असते. यामुळे तुम्हाला इक्विटी म्युचुअल फंडांसारखा दीर्घ मुदतीचा परतावा आणि कर-लाभ दोन्ही मिळतात.

अडचणीसाठी निधी तयार करा

नोकरी जाणे, अकस्मात येणारे आजारपण अशा अडचणींसाठी एक निधी तयार करून ठेवा. जेव्हा अशी बिकट परिस्थिती येते किंवा पैशाची निकड भासते, तेव्हा तुम्ही या निधीतून पैसे काढू शकता. हा निधी तुमच्या सहा ते बारा महिन्याच्या मासिक खर्चाएवढा असायला हवा आणि म्हणूनच जेव्हा तुमची पगारवाढ होते आणि जीवनशैली सुधारते तेव्हा त्यात भर घालायला हवी.

विमा कव्हरकडे लक्ष द्या

मिळकत वाढल्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या जीवनशैलीचा स्तरही वाढतो. तुमचे आयुर्विमाचे एकूण विमाधन तुमच्या सध्याच्या मिळकतीशी निगडित असते, त्यामुळे तुमच्या पगारवाढीनुसार तुमचे विमाधन वाढवणे योग्यच. तुमचे विमाधन तुमच्या वार्षिक मिळकतीच्या १० ते २० पट असायला हवे. त्यामुळे भक्कम पगारवाढ झाल्यावर तुम्हाला तुमचे विमाधन वाढवणे गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा वित्तीय वर्षासाठी तुमचे अर्थकारण व्यवस्थित करता, तेव्हा पगारवाढीसोबत वाढलेल्या कर देयतेकडे लक्ष ठेवा. कदाचित तुम्हाला पगारवाढीचा नीट फायदा घेण्यासाठी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी बोलावे लागू शकते.

आदिल शेट्टी,

सीईओ बँकबझार