खासगी संगणक व प्रिंटर उत्पादनातील अग्रगण्य कंपनी ‘एचपी’च्या भारतातील ५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच कंपनी जगभरातील आपल्या जवळपास ९ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करु शकते.

गेल्या आठवड्यातच कंपनीने याबाबत माहिती देताना, वर्ष २०२० पर्यंत जगभरातील ७ ते ९ हजार कर्मचारी कमी केले जातील अशी शक्यता वर्तवली होती. नफा वाढावा आणि उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी कार्यप्रणाली पुनर्रचनेअंतर्गत ही कपात केली जाणार आहे. जगभरात ‘एचपी’चे ५५ हजार कर्मचारी आहेत.

भारतातील तज्ज्ञांनुसार कंपनीच्या या योजनेचा परिणाम एचपी इंडियावर देखील होणार आहे. कंपनीच्या योजनेबाबत माहिती असणाऱ्या एका अधिकाऱ्याने इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, “कंपनीने काही मॉडेल्सचं उत्पादन थांबवलं असून खासगी संगणकांच्या मागणीत सातत्याने घट आहे. भारतात कर्माचारी कपात होणं जवळपास निश्चित आहे”. तर, द हेड हंटर्स इंडियाचे सीईओ क्रिस लक्ष्मीकांत यांच्यानुसार, ” भारत हा एचपीसाठी मुख्य लक्ष्य असलेल्यांपैकी एक आहे, पण एचपी इंडियाकडून ५०० कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. एचपी इंडियावर परिणाम नक्कीच जाणवेल”.

‘भारतातील किती कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. जागतिक स्तरावर ही कपात होत आहे, कुठे किती कपात होईल हे अद्याप निश्चित झालेलं नाही’, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

एक महिन्यापूर्वीच कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनात बदल झाला आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कपात करण्याबाबतचं वृत्त आलं आहे.