Hyundai कंपनीने आपली नवीन सब-कॉम्पॅक्ट सेडान कार Aura साठी बुकिंग घ्यायला सुरूवात केलीये. ही कार डिसेंबर 2019 मध्ये कंपनीने सादर केली होती, तर 21 जानेवारी रोजी कार लाँच होईल. केवळ दहा हजार रुपयांमध्ये या कारची बुकिंग सुरू झालीये. भारतीय बाजारात मारुती डिझायर आणि होंडा अमेझ यांसारख्या गाड्यांशी ऑराची टक्कर असेल.

फीचर्स काय ?
“नवीन वर्षाची सुरुवात ऑराच्या बुकिंगद्वारे झाली आहे. ऑराला चांगला प्रतिसाद मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे”, असे कंपनीचे संचालक तरुण गर्ग यांनी म्हटले आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे, ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायात उपलब्ध करण्यात येणार आहे. इंजिनचे तीन पर्याय आणि 12 व्हेरिअंट्समध्ये ऑरा उपलब्ध असेल. यातील एक इंजिन 82 bhp पावरचं 1.2 लीटर पेट्रोल, दुसरं 99 bhp पावरचं 1-लिटर टर्बो पेट्रोल आणि तिसरं 74 bhp पावरचं 1.2-लिटर डिझेल इंजिन आहे. 1.2-लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. तर, 1-लिटरच्या टर्बो पेट्रोल इंजिनसह केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. तिन्ही इंजिन बीएस-6 मानकांसह असतील.

आणखी वाचा – नववर्षात Kia Seltos च्या किंमतीत बदल, ‘ही’ आहे नवी किंमत

किंमत किती?
ऑराच्या इंटेरिअरबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही, पण कॅबिन आणि फीचर्स ‘ग्रँड आय-10 नियोस’प्रमाणे असतील अशी शक्यता आहे. ऑराच्या टॉप व्हेरियंटमध्ये अँड्रॉयड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेसह 8 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम, 5.3 इंचाचा डिजिटल स्पीडोमीटर आणि एमआयडी, वायरलेस चार्जर, प्रीमियम साउंड सिस्टम देण्यात आला आहे. ऑराची किंमत 6 लाख ते 9 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.